(मुंबई)
सक्तवसुली संचालनालयाने (ED) मोठी कारवाई करत अमित अशोक थेपाडे यांना अटक केली आहे. ही कारवाई मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायदा (PMLA), 2002 अंतर्गत सुरू असलेल्या तपासाचा भाग असून, कॅनरा बँकेशी संबंधित तब्बल ₹117.06 कोटींच्या फसवणुकीच्या आरोपावरून ही अटक करण्यात आली. बराच काळ अधिकाऱ्यांना चकवा देणारे थेपाडे अखेर दक्षिण मुंबईतील एका पाचतारांकित हॉटेलमध्ये ईडीच्या जाळ्यात अडकले.
हॉटेलवर धाड व जप्ती
गुप्त माहितीनुसार, थेपाडे गेल्या दोन महिन्यांपासून हॉटेलमध्ये वास्तव्यास होते. छाप्यामध्ये ५० हून अधिक बँक खाती गोठवण्यात आली, तर ₹९.५ लाखांची रोकड, ₹२.३३ कोटी किमतीचे बुलियन, सोने-हिर्यांचे दागिने, दोन वाहने आणि वित्तीय व्यवहारांसंबंधी महत्त्वपूर्ण पुरावे असणारी डिजिटल उपकरणे जप्त करण्यात आली. विशेष न्यायालयाने थेपाडे यांना ५ दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे.
फसवणुकीचा प्रकार
ईडीने तपासाची सुरुवात सीबीआय, एसीबी पुणे यांनी दाखल केलेल्या दोन गुन्ह्यांच्या आधारे केली. हे गुन्हे गॅलेक्सी कन्स्ट्रक्शन्स अँड कॉन्ट्रॅक्टर्स प्रा. लि. आणि मित्सॉम एंटरप्रायजेस प्रा. लि. या थेपाडे यांच्या कंपन्यांशी संबंधित आहेत. कॅनरा बँकेत विविध स्थावर मालमत्तांना तारण ठेवून त्यांनी कर्ज घेतले होते. मात्र, तपासात उघड झाले की आधीच विकलेल्या किंवा एकाच मालमत्तेवर दोनदा तारण ठेवून बँकेला फसवण्यात आले आणि त्यातून मिळालेली रक्कम वैयक्तिक वापरासाठी वळवण्यात आली.
ईडीचा तपास
ईडीच्या मते, थेपाडे यांनी गुन्हेगारी मार्गाने मिळालेल्या निधीचे मूळ स्वरूप लपवण्यासाठी जटिल आर्थिक जाळे उभारले. फॉरेन्सिक आर्थिक विश्लेषण, दीर्घकालीन गुप्त तपास आणि देखरेखीनंतर त्यांच्या अनेक संशयास्पद व्यवहारांचा पर्दाफाश झाला आहे. या प्रकरणात आणखी काही मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

