( नवी दिल्ली )
राष्ट्रीय महामार्गांवर प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. National Highways Authority of India (NHAI) ने 2026-27 या आर्थिक वर्षासाठी FASTag वार्षिक टोल पासच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार 1 एप्रिल 2026 पासून वाहनचालकांना वार्षिक टोल पाससाठी 3,000 रुपयांऐवजी 3,075 रुपये मोजावे लागणार आहेत. म्हणजेच पासच्या किमतीत सुमारे 2.5 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे.
खाजगी वाहनांसाठीच सुविधा
हा वार्षिक पास फक्त खासगी (नॉन-कमर्शियल) वाहनांसाठी लागू आहे. पास घेण्यासाठी वाहनावर सक्रिय FASTag असणे आवश्यक आहे. राष्ट्रीय महामार्गांवर वारंवार प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी ही सुविधा अधिक सोयीची ठरते.
वैधता कशी असेल?
3,075 रुपयांचा वार्षिक पास घेतल्यावर तो खालील दोन अटींपैकी जे आधी पूर्ण होईल त्यानुसार वैध राहतो:
-
एक वर्ष पूर्ण होईपर्यंत, किंवा
-
200 वेळा टोलनाका ओलांडण्यापर्यंत
जर वाहनचालकांनी वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच 200 वेळा टोलनाका ओलांडले, तर पासची वैधता तेथेच संपते.
15 ऑगस्ट 2025 पासून योजना सुरू
राष्ट्रीय महामार्गांवरील प्रवास अधिक जलद आणि सोयीस्कर करण्यासाठी 15 ऑगस्ट 2025 पासून FASTag वार्षिक पास सुविधा सुरू करण्यात आली होती. यामुळे टोल प्लाझावर वेळेची बचत होत असून डिजिटल टोल पेमेंटला चालना मिळाली आहे.
50 लाखांहून अधिक वाहनचालकांचा वापर
या योजनेला वाहनचालकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. सध्या देशभरात 50 लाखांहून अधिक वाहनचालक वार्षिक टोल पासचा वापर करत आहेत. खासगी वाहनांकडून घेतल्या जाणाऱ्या टोल व्यवहारांपैकी सुमारे 28 टक्के व्यवहार वार्षिक FASTag पासद्वारे होत असल्याची माहिती देण्यात आली आहे.
FASTag सेवा 2016 पासून
भारतामध्ये FASTag सेवा 2016 मध्ये सुरू करण्यात आली. आतापर्यंत देशात सुमारे 11.86 कोटी FASTag जारी करण्यात आले असून त्यापैकी सुमारे 5.9 कोटी FASTag सध्या सक्रिय आहेत.
मार्चपर्यंत रिचार्ज केल्यास जुना दर
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, जे वाहनचालक मार्च 2026 पर्यंत वार्षिक पास रिचार्ज करतील, त्यांना जुन्या दराने म्हणजेच 3,000 रुपयांत पास उपलब्ध होईल.

