(पुणे)
पुणे शहरातील लोणीकंद परिसरात विवाहित तरुणीच्या आत्महत्येची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सासरच्या लोकांकडून होत असलेल्या मानसिक छळाला आणि पैशांच्या मागणीला कंटाळून एका तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. मृत तरुणीचे नाव वैष्णवी जामकर असे असून तिचे लग्न अवघ्या आठ महिन्यांपूर्वी झाले होते. सुरुवातीला सर्व काही सुरळीत सुरू होते, मात्र काही दिवसांपासून सासरच्या मंडळींकडून पैशांसाठी दबाव टाकला जात असल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून वैष्णवीने घरातच ओढणीच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पीडित महिलेच्या कुटुंबीयांनी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर पोलिसांनी वैष्णवीच्या पती, सासू आणि सासऱ्यांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून पुरावे गोळा केले असून या आत्महत्येमागील नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे.

