(नवी दिल्ली /वृत्तसंस्था)
भारतीय रेल्वे आता खऱ्या अर्थाने सामान्य प्रवाशांच्या प्रवासावर लक्ष केंद्रित करत आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे जनरल डब्यातून प्रवास करणाऱ्या कोट्यवधी प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. एसी आणि स्लीपरप्रमाणेच आता जनरल डबेही स्वच्छ, आधुनिक आणि प्रवाशांसाठी अधिक सोयीस्कर दिसणार आहेत.
रेल्वेच्या कार्यक्षमतेत आमूलाग्र सुधारणा करण्यासाठी मंत्र्यांनी ‘मिशन ५२’ जाहीर केले आहे. या अंतर्गत वर्षभरात दर आठवड्याला एक अशा एकूण ५२ मोठ्या सुधारणा केल्या जाणार असून, त्याची सुरुवात सर्वाधिक गर्दी असणाऱ्या जनरल डब्यांच्या स्वच्छतेपासून होणार आहे.
आतापर्यंत लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये एसी आणि स्लीपर कोचवर अधिक भर दिला जात होता. मात्र, जनरल डब्यांची अवस्था अनेकदा दुर्लक्षित राहायची. आता हे चित्र बदलणार आहे.
जनरल डब्यांमध्ये होणारे प्रमुख बदल
- शौचालये, वॉशबेसिन आणि कचरापेट्यांची दररोज कसून स्वच्छता
- गाडी स्टेशनवर थांबताच स्वच्छता कर्मचारी तातडीने डब्यात प्रवेश करून काम पूर्ण करतील
- स्वच्छतेसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) तंत्रज्ञानाचा वापर
- स्वच्छतेनंतर डब्यांचे फोटो कंट्रोल रूमला पाठवणे बंधनकारक
- AI प्रणालीद्वारे प्रत्यक्ष स्वच्छतेची पडताळणी
- कामात हलगर्जीपणा आढळल्यास कंत्राटदारांवर कडक दंडात्मक कारवाई
- स्वच्छता सुपरवायझरसाठी १२ वी उत्तीर्ण आणि ITI पात्रता अनिवार्य
रेल्वे उत्पन्न वाढीसाठी मोठी योजना
प्रवासी सुविधांसोबतच रेल्वेच्या महसूलवाढीवरही भर देण्यात येत आहे. ‘गतीशक्ती कार्गो टर्मिनल’ प्रकल्पाचा मोठ्या प्रमाणावर विस्तार केला जाणार असून, पुढील पाच वर्षांत ५०० नवीन कार्गो टर्मिनल्स उभारण्याचे नियोजन आहे. या माध्यमातून रेल्वेला सुमारे ३० हजार कोटी रुपयांचा महसूल मिळण्याची अपेक्षा आहे.
या निर्णयांमुळे जनरल डब्यातून प्रवास करणाऱ्या सामान्य प्रवाशांचा अनुभव अधिक स्वच्छ, सुरक्षित आणि आधुनिक होणार असून, भारतीय रेल्वेचा ‘आम आदमी’केंद्रित प्रवास खऱ्या अर्थाने नव्या दिशेने जाणार आहे.

