(ठाणे)
अंबरनाथमध्ये शुक्रवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू, तर तिघेजण जखमी झाले आहेत. भरधाव वेगात रॉंग साइडने येणाऱ्या कारने सलग तीन दुचाकींना जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. धडक इतकी भीषण होती की एक दुचाकीस्वार थेट उड्डाणपुलाखाली गेला. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार मृतांमध्ये लक्ष्मण शिंदे, शैलेश जाधव, सुमीत चेलानी आणि चंद्रकांत अनारसे यांचा समावेश आहे.
अंबरनाथ पूर्व–पश्चिमेला जोडणाऱ्या उड्डाणपुलावर शुक्रवारी सायंकाळी वाहतूक कोंडी झाली होती. याचवेळी हुतात्मा चौकातून पश्चिमेकडे जाणारी एक कार अत्यंत भरधाव वेगाने रॉंग साइडने येत होती. अचानक चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि कारने तीन दुचाकींना चिरडत जोरदार धडक दिली. कार ड्रायव्हर लक्ष्मण शिंदेंना हृदयविकाराचा झटका आल्याने कारवरील ताबा सुटल्याने हा भीषण अपघात झाला, अशी चर्चाही घटनास्थळी होती. या धडकेनंतर काहीजण पुलावरच फेकले गेले, तर एक दुचाकीस्वार थेट पुलाखाली कोसळला. या अपघातात कार पलटी होऊन चेंदामेंदा झाली. घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी जमली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला.
या अपघाताचा संपूर्ण थरार जवळच्या सीसीटीव्हीत कैद झाला आहे. पुलाखाली लहान मुलं खेळत असताना अचानक मोठा आवाज झाला आणि ती मुळे घाबरून पळताना दिसत आहेत. त्याचवेळी वरून एक दुचाकीस्वार खाली कोसळताना दिसतो. सुदैवाने मुलांना कोणतीही दुखापत झालेली नाही. जखमींवर उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात तसेच काही खासगी रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.
अंबरनाथ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक शब्बीर सय्यद यांनी दिलेल्या माहितीनुसार अपघात सायंकाळी सुमारे सात वाजता झाला. कार रॉंग साइडने धावत येत असल्याने चार दुचाकींना धडक बसली. तिघे जखमी असून त्यांचे जबाब घेतले जात आहेत. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
मृतांची नावे —
* शैलेश जाधव (अंबरनाथ)
* चंद्रकांत अनार्थे (अंबरनाथ)
* सुमीत चेलानी (उल्हासनगर)
* लक्ष्मण शिंदे (अंबरनाथ पूर्व)
विशेष म्हणजे या कारमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतील शिवसेनेच्या उमेदवार किरण चौबे बसल्या होत्या. त्या देखील या अपघातात जखमी झाल्या आहेत. अपघातात मृत झालेल्यांमध्ये अंबरनाथ पालिकेतील दोन कर्मचारीदेखील होते अशी माहिती आहे. शैलेश जाधव आणि चंद्रकांत अनार्थे अशी त्यांची नावे आहेत. ते टाऊन प्लॅनिंग कार्यालय बंद करण्यासाठी गेले होते. अपघातामुळे अंबरनाथमध्ये हळहळ व्यक्त होत असून नागरिक आणि वाहतूक व्यवस्थेतील त्रुटींवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

