(वॉशिंग्टन)
इराण आणि इस्राईल, अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाला पंधरवडा उलटला असताना अमेरिकेने आपले अत्यंत घातक आणि ऐतिहासिक स्ट्रॅटेजिक बॉम्बर विमान B-52 Stratofortress सक्रियपणे तैनात केले आहे. ‘ऑपरेशन एपिक फ्युरी’ अंतर्गत या बॉम्बरचा वापर करण्यात येत असून १९५० च्या दशकापासून सेवेत असलेले हे विमान आधुनिकीकरणानंतर आजही अमेरिकेच्या आण्विक त्रयीचा (Nuclear Triad) महत्त्वाचा भाग मानले जाते.
आण्विक आणि पारंपरिक दोन्ही हल्ल्यांची क्षमता
B-52 बॉम्बर विमान आण्विक बॉम्ब तसेच आण्विक क्रूझ क्षेपणास्त्रे वाहून नेण्यास सक्षम आहे. जमीन, समुद्र आणि हवाई मार्गाने आण्विक हल्ला करण्याच्या अमेरिकेच्या रणनीतीत या विमानाची महत्त्वाची भूमिका आहे. सध्या सुरू असलेल्या युद्धात आतापर्यंत पारंपरिक शस्त्रास्त्रांचा वापर करण्यात आला असला तरी आण्विक क्षमता असल्यामुळे या विमानाला “डूम्सडे बॉम्बर” म्हणूनही ओळखले जाते.
प्रचंड पेलोड आणि लांब पल्ल्याची रेंज
B-52 स्ट्रॅटोफोर्ट्रेसची पेलोड क्षमता सुमारे ७० हजार पौंड म्हणजेच जवळपास ३२ टन आहे. या विमानातून प्रेसिजन-गायडेड बॉम्ब, क्रूझ मिसाईल्स, माईन्स आणि विविध प्रकारचे मुनिशन वापरले जाऊ शकते. हे विमान १४ हजार किलोमीटरपेक्षा अधिक अंतर पार करू शकते आणि सुमारे ५० हजार फूट उंचीवर उड्डाण करण्याची क्षमता ठेवते. त्यामुळे ते शत्रूच्या हवाई क्षेत्रात खोलवर न जाता दूरवरून ‘स्टँड-ऑफ’ हल्ले करू शकते.
किती घातक आहे B-52?
B-52 ची ताकद केवळ आण्विक शस्त्रांपुरती मर्यादित नाही. मोठ्या प्रमाणावर हल्ले करण्याची क्षमता आणि विश्वासार्हता यामुळे हे विमान आजही अमेरिकन वायूशक्तीचे प्रतीक मानले जाते. इराणचे एअर डिफेन्स आधीच कमकुवत झाल्याने या बॉम्बरला खोलवर हल्ले करणे तुलनेने सोपे होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
२८ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या लष्करी कारवाईदरम्यान B-52 बॉम्बरने इराणमधील बॅलेस्टिक मिसाईल साईट्स, कमांड अँड कंट्रोल केंद्रे तसेच इतर महत्त्वाच्या लष्करी ठिकाणांवर हल्ले केल्याची माहिती समोर आली आहे. सध्या अमेरिकेने पारंपरिक हल्ल्यांवर लक्ष केंद्रीत केले असले तरी भविष्यात आण्विक संघर्षाचा धोका वाढल्यास त्याचे परिणाम जगासाठी गंभीर ठरू शकतात.

