(दापोली)
दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स कॉलेजची विद्यार्थिनी आयेशा इनायत खोत हिला मुंबई विद्यापीठाच्या 2024-25 या वर्षासाठीच्या ‘बेस्ट स्टुडन्ट प्लॅटिनम गर्ल अवॉर्ड’ या प्रतिष्ठित पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले. विद्यापीठाशी संलग्न असलेल्या सुमारे ९५० महाविद्यालयांमधील हजारो विद्यार्थिनींमधून आयेशाची या पुरस्कारासाठी निवड झाली. या पुरस्कारामध्ये रोख १५,००० रुपये, ट्रॉफी आणि प्रमाणपत्र यांचा समावेश आहे.
१४ नोव्हेंबर २०२५ रोजी विद्यापीठाच्या सभागृहात झालेल्या या भव्य सोहळ्यात आयेशाचा सन्मान विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी, प्रकुलगुरू डॉ. अजय भामरे तसेच विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. सुनील पाटील उपस्थित होते.
2024-25 या शैक्षणिक वर्षात आयेशाने दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स कॉलेजमधून रसायनशास्त्र विषयात तृतीय वर्षाची पदवी प्रथम श्रेणीत संपादन केली. महाविद्यालय आणि विद्यापीठ या दोन्ही स्तरांवर उत्कृष्ट कामगिरी करत आयेशाने दापोलीचा झेंडा विद्यापीठात उंच फडकवला आहे.
अभ्यासाबरोबरच सहशैक्षणिक, सांस्कृतिक तसेच विविध शैक्षणिक उपक्रमांमध्ये सहभाग घेत विद्यापीठ, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर तिने उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
आपले मनोगत व्यक्त करताना आयेशाने, “स्वप्न पाहा आणि ते पूर्ण करण्यासाठी अहोरात्र परिश्रम करा,” असे सांगत आपल्या यशाचे श्रेय आई-वडिलांबरोबरच महाविद्यालयाला दिले. या सोहळ्यासाठी आयेशाचे आई-वडील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे, उपप्राचार्य डॉ. घनश्याम साठे आणि डॉ. राजेंद्र मोरे हे उपस्थित होते.
सध्या आयेशा खोत नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड रिसर्च, भुवनेश्वर (ओडिशा) येथे रसायनशास्त्र या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. आयेशाच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल दापोली शिक्षण संस्थेचे सर्व संचालक तसेच महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी तिचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.

