(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धेनिमित्त देशभरातून सहभागी झालेल्या धावपटूंची आरोग्य तपासणी मालगुंड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने करण्यात आली. धावपटूंना सुरक्षित आणि निरोगी वातावरणात स्पर्धा पूर्ण करता यावी, यासाठी स्पर्धास्थळी विशेष वैद्यकीय मदत केंद्र उभारण्यात आले होते.
या केंद्रावर डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पथकाने धावपटूंची रक्तदाब, नाडी, ऑक्सिजन पातळी आदी आवश्यक तपासण्या केल्या. तसेच गरजेनुसार प्राथमिक उपचार देत आरोग्यविषयक मार्गदर्शनही करण्यात आले.
अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धेसाठी देशातील विविध राज्यांमधून मोठ्या संख्येने धावपटू सहभागी झाले होते. स्पर्धेदरम्यान कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवू नये, यासाठी मालगुंड प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य पथक सतर्क राहून सेवा देत होते.
ही स्पर्धा शनिवारी रात्री १२ ते रविवारी सकाळी ८ या वेळेत पार पडली. त्यासाठी आरोग्य पथक दुपारी २ वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजेपर्यंत सतत उपस्थित राहून सेवा देत होते.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ. माहेश्वरी सातव यांच्या मार्गदर्शनाखाली मालगुंड प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही जबाबदारी पार पाडली.
या वैद्यकीय सेवेसाठी स्पर्धा आयोजक तसेच धावपटूंनी आरोग्य विभागाच्या कार्याचे विशेष कौतुक केले.

