(रत्नागिरी)
तालुक्यातील कोतवडे येथील सनगरेवाडी परिसरातील एका तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली असून या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मृत व्यक्तीचे नाव दिपक कमलाकर वारेकर (वय ३६, रा. कोतवडे, सनगरेवाडी, ता. जि. रत्नागिरी) असे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वारेकर हे गेल्या चार वर्षांपासून मधुमेह या आजाराने त्रस्त होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडत असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्र, कोतवडे येथे त्यांची तपासणी करण्यात आली होती.
दरम्यान, १३ मार्च रोजी रात्री साडेआठच्या सुमारास त्यांची प्रकृती अधिकच खालावल्याने नातेवाईकांनी रात्री ११.१५ वाजता त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालय, रत्नागिरी येथे उपचारासाठी दाखल केले. मात्र तेथे उपचार सुरू असताना १४ मार्च रोजी पहाटे सुमारे २.२० वाजण्याच्या सुमारास वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.
या प्रकरणी आकस्मिक मृत्यू क्रमांक १८/२०२६ (बीएनएसएस कलम १९४) नुसार रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

