(रत्नागिरी)
संगमेश्वर तालुक्यातील तुळसणी गावातील २१ वर्षीय कु. मंदार रमेश आग्रे या पॅराप्लेजिक तरुणाला आरएचपी फाउंडेशनच्या माध्यमातून निओमोशनची आधुनिक इलेक्ट्रिक व्हीलचेअर प्राप्त झाली आहे.
मंदारच्या वडिलांचे नाव रमेश सोमाजी आग्रे असून ते मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. आई रेशमी रमेश आग्रे गृहीणी आहेत, तर भाऊ गौरव शिक्षण घेत आहे. मंदार वयाच्या १६व्या वर्षापर्यंत पूर्णपणे निरोगी होता; मात्र २०१९ मध्ये स्पायनल कॉर्ड ड्राय झाल्याने त्याच्या पायांमधील ताकद कमी होऊ लागली आणि शेवटी त्याला चालणे अशक्य झाले. परिणामी, त्याला व्हीलचेअरवर अवलंबून राहावे लागले.
सध्या मंदार मुंबईतील शरण संस्थेत फिजिओथेरपी आणि उपचार घेत आहे. तो हस्तकला वस्तू तयार करण्यात तरबेज आहे आणि स्वतःच्या दैनंदिन गोष्टी स्वतंत्रपणे करू शकतो; परंतु घराबाहेर जाण्या-येण्यासाठी त्याला इतरांवर अवलंबून राहावे लागत होते.
याचदरम्यान एका शिबिरात त्याची ओळख आरएचपी फाउंडेशन रत्नागिरीचे अध्यक्ष श्री. सादिक करीम नाकाडे आणि सदस्य श्री. समीर करीम नाकाडे यांच्याशी झाली. मंदारने त्यांच्याकडे इलेक्ट्रिक व्हीलचेअरची मागणी केली. त्यावर फाउंडेशनचे संस्थापक व अध्यक्ष सादिक नाकाडे यांनी इम्पॅक्ट गुरू फाउंडेशनच्या साहाय्याने मंदारला निओमोशनची अत्याधुनिक इलेक्ट्रिक व्हीलचेअर प्रदान केली.
या उपक्रमामुळे मंदार आता पूर्णपणे स्वावलंबी होणार आहे. तो कोणत्याही मदतीशिवाय बाहेर जाऊन काम करू शकेल. एवढेच नव्हे, तर त्याला मुंबईत झोमॅटोमध्ये डिलिव्हरीचे कामही मिळवून देण्यात आले आहे. त्यामुळे त्याच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारेल आणि आत्मविश्वास वाढेल.
व्हीलचेअर मिळाल्यानंतर मंदार व त्याच्या कुटुंबीयांनी आरएचपी फाउंडेशन आणि इम्पॅक्ट गुरू फाउंडेशनचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.

