(रत्नागिरी / प्रतिनिधी)
दहावीच्या परीक्षेतील गणिताचा पेपर कठीण गेल्याच्या नैराश्यातून एका विद्यार्थिनीने टोकाचे पाऊल उचलत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना खेडशी येथे आज (बुधवारी) घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
अनुष्का अमित चिपरीकर (वय १६, रा. खेडशी) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. बुधवारी दहावीच्या परीक्षेअंतर्गत विज्ञान विषयाचा पेपर झाला होता. पेपर सुटल्यानंतर अनुष्का दुपारी घरी परतली. मात्र यापूर्वी झालेला गणिताचा पेपर कठीण गेल्याने ती मानसिक तणावाखाली असल्याचे सांगितले जात आहे. दुपारच्या सुमारास घरातच तिने गळफास घेत आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. हा प्रकार लक्षात येताच कुटुंबीयांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला.
दरम्यान, अनुष्काच्या आत्महत्येची बातमी परिसरात पसरताच ग्रामस्थांनी तिच्या घराकडे धाव घेतली. या घटनेमुळे खेडशी परिसरात शोककळा पसरली असून विद्यार्थ्यांवरील परीक्षेच्या तणावाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

