( गणपतीपुळे / वैभव पवार )
मालगुंड गावचे सुपुत्र तथा भारत भूमीच्या रक्षणासाठी भारतीय सीमेवर सैनिक म्हणून कार्यरत असलेल्या विजय हुमणे या भारतीय सैनिकाची भेट मालगुंड येथील जीवन शिक्षण शाळा नंबर १ च्या विद्यार्थ्यांशी सोमवारी २१ एप्रिल रोजी झाली. या भेटीत विद्यार्थ्यांनी भारतीय सैनिक विजय हुमणे यांच्याशी मुक्तपणे संवाद साधून भारतभूमीच्या सीमेवर सैनिकांचा असलेला धाडसी पहारा आणि तेथील अनुभव विद्यार्थ्यांनी जाणून घेतले. या भेटी प्रसंगी मालगुंड येथील जीवन शिक्षण शाळा नंबर एकच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने समितीचे अध्यक्ष डॉ. संतोष केळकर यांच्या हस्ते भारतीय सैनिक तथा शाळेचे माजी विद्यार्थी व मालगुंड गावचे सुपुत्र असलेल्या विजय हुमणे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्रातील सर्वात जुन्या शाळांपैकी एक असलेली “जि. प. आदर्श जीवन शिक्षण शाळा मालगुंड नं1” यंदा शतकोत्तर अमृत महोत्सवी वर्षात अर्थात 175व्या वर्षात पदार्पण करणार आहे. त्यानिमित्ताने येथील शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने विविध प्रबोधनात्मक आणि विद्यार्थ्यांच्या जडणघडणीशी निगडित असलेले विविधांगी उपक्रम राबविले जात आहेत. असे वेगवेगळे उपक्रम शाळेमध्ये सुरू असतानाच विद्यार्थ्यांना भारतभूमीच्या सीमेवर लढणाऱ्या सैनिकांची ओळख व्हावी, या उद्देशाने मालगुंड गावचे सुपुत्र असलेल्या आणि सध्या रजेनिमित्ताने गावी आलेले मालगुंड गावातील जवान विजय हुमणे यांना शाळेत मुलांशी गप्पा मारण्यासाठी व अनुभव सांगण्यासाठी मालगुंड येथील जीवन शिक्षण शाळा नंबर २ च्या शाळा व्यवस्थापन समितीने विशेष आमंत्रित केले होते.
भारतीय सैनिक असलेले विजय हुमणे हे या शाळेचे माजी विद्यार्थी असल्याने शालेय विद्यार्थ्यांना त्यांची विशेष ओळख करून देण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांना सांगण्यात आले की,गेली सुमारे 16 वर्षे ते भारतीय सैन्यदलात कार्यरत आहेत. उत्तराखंड, उत्तर प्रदेश, जम्मू काश्मीर, मध्यप्रदेश, राजस्थान इ ठिकाणी त्यांनी सेवा दिली आहे. सध्या पश्चिम बंगाल येथे ते कार्यरत आहेत. त्यानंतर विजय हुमणे यांनी आपले शालेय जीवन, खेळाची आवड, सैन्यात भरती, प्रशिक्षण व कामातील अनुभव मुलांना सांगितले. यावेळी विद्यार्थ्यांनी ही त्यांना उत्स्फूर्तपणे प्रश्न विचारले. विद्यार्थ्यांच्या या प्रश्नांना भारतीय सैनिक विजय हुमणे यांनी समर्पक उत्तरे देऊन मुक्तपणे संवाद साधला.
या भेटी प्रसंगी भारतीय सैनिक विजय हुमणे यांच्या शुभहस्ते शाळेतील विशेष प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. त्यामध्ये अक्षरगंगा प्रज्ञाशोध परीक्षेत जाकादेवी केंद्रात इ 1ली मध्ये प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थी कु. अरिजीत संतोष केळकर व इ 4थी मध्ये 4था क्रमांक प्राप्त विद्यार्थिनी कु. निहीरा संतोष केळकर यांना भारतीय सैनिक विजय हुमणे यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. तसेच सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले. या भेटी प्रसंगी भारतीय सैनिक विजय हुमणे यांनी शाळेच्या मुलांसाठी पेन, पेन्सिल व खाऊ आणला होता. त्याचेही वाटप यावेळी करण्यात आले.
हा कार्यक्रम पार पडल्यानंतर शाळेच्या सर्व भारतीय सैनिक विजय हुमणे यांच्यासोबत फोटो काढले. यावेळी भारतीय सैनिकांच्या युनिफॉर्म मधील जवानासोबत फोटो काढल्याचा आनंद मुलांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष डॉ. संतोष केळकर, उपाध्यक्ष श्री विशाल लिंगायत, सदस्य श्री अमोल पात्ये तसेच शिक्षिका सौ. इंदुमती नाईक मॅडम उपस्थित होत्या. या कार्यक्रमात शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ. संतोष केळकर यांनी आपल्या मनोगतात कार्यक्रमाचा उद्देश सांगितला तर शाळेच्या शिक्षिका इंदुमती नाईक मॅडम यांनी आभार मानले.