(गणपतीपुळे / वैभव पवार)
जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ व प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे नजीकच्या निसर्गरम्य मालगुंड गावाचा ही आता पर्यटनात्मक कायापालट होऊ लागला आहे. निसर्ग सौंदर्याने नटलेल्या या गावामध्ये आधुनिक मराठी कवितेचे पहिले जनक कविवर्य केशवसुतांचे प्रसिध्द जन्मस्थान आहे. या ठिकाणी केशवसुतांचे एक देखणे स्मारक आणि त्यांचे कौलारू जन्मघर पर्यटकांना पाहायला मिळते. मात्र, कवितेची राजधानी असलेल्या केशवसुतांच्या जन्मभूमीत आल्यानंतर पर्यटकांना आणखी वेगळी पर्यटनाची रमणीय भुरळ पाडण्यासाठी मालगुंड ग्रामपंचायतीने पर्यटन विकास कामांवर भर दिला आहे. त्याचाच एक भाग म्हणून मालगुंड तळेपाट परिसरात असलेल्या शुभ्रकमळ तलावाचा पर्यटनात्मक विकास करण्याच्या दृष्टीने नवा साज दिला जात असून सध्या सुशोभीकरणाची कामे वेगानी सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे मालगुंड मध्ये लवकरच एका नव्या प्रेक्षणीय पर्यटन स्थळाची भर पडणार असून अनेक ठिकाणचे पर्यटक निश्चितच या पर्यटन स्थळाकडे आकर्षित होतील अशा पद्धतीने सध्या तलावाच्या सुशोभीकरणाचे करण्याचे काम सुरू आहे.
या शुभ्र कमळ तलावाच्या विकास कामासाठी रत्नागिरी जिल्हा पर्यटन विकास आराखड्यातून निधी प्राप्त झाला असून त्याची अंमलबजावणी करण्याचे काम मालगुंड ग्रामपंचायतीला देण्यात आले असून संपूर्ण तलावाच्या कामाचा ताबा हा मालगुंड ग्रामपंचायतीकडे असणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. मालगुंड ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात हे शुभ्र कमळ तलाव येत असल्याने या तलावाच्या सुशोभीकरणाकडे विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. सध्या या तलावाच्या संपूर्ण सुशोभिकरणाचे काम रत्नागिरीतील नामांकित ठेकेदार भैय्या शिंदे यांच्या विशेष कल्पकतेतून केले जात आहे.
येत्या काही दिवसातच या तलावाच्या संपूर्ण सुशोभीकरणाचे काम पूर्णत्वास जाणार असल्याचे चित्र दिसून येत असून संपूर्ण शुभ्र कमळ तलावाचा परिसर हा नव्या रूपात आकर्षित होणार असल्याने स्थानिक ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. यात तलावाचा पर्यटनात्मक सर्वांगीण विकास झाल्यास तळेपाट परिसरातील स्थानिक तरूणांना व ग्रामस्थांना पर्यटनात्मक रोजगाराची मोठी संधी उपलब्ध होणार असून पर्यटन वाढीसाठी मालगुंड ग्रामपंचायतीकडून विशेष पुढाकार घेतला जात आहे.

