(रत्नागिरी/ प्रतिनिधी)
कुवारबाव-साईनगर परिसरात काही दिवसांपूर्वी घडलेल्या सूरज राजाराम झोरे (वय २५) या तरुणाच्या निर्घृण हत्याकांडातील तिन्ही संशयित आरोपींना मंगळवारी न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. या निर्णयामुळे जिल्हाभरात खळबळ उडालेल्या या प्रकरणाच्या तपासाला नवे वळण मिळाले असून, पोलिसांकडून आता गुन्ह्यामागील सर्व पैलूंचा सखोल तपास सुरू आहे.
न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेल्या आरोपींमध्ये सोहम एकनाथ म्हात्रे (वय १८, रा. शांतीनगर-रसाळवाडी), अभिषेक देवानंद राठोड (वय २२, रा. आदिनाथ नगर झोपडपट्टी) आणि नजीबूल शेख उर्फ सोनू (वय २१, रा. शांतीनगर-रसाळवाडी) यांचा समावेश आहे. मृत सूरज झोरे आणि मुख्य संशयित सोहम म्हात्रे यांच्यात सुमारे वर्षभरापूर्वी आर्थिक व्यवहारावरून वाद निर्माण झाला होता. त्यानंतर दोघांमधील संबंध अधिकच ताणले गेले. या वादाची धग कालांतराने वैयक्तिक पातळीवर पोहोचली. सूरजकडून सातत्याने शिवीगाळ केली जात असल्याची भावना सोहमच्या मनात होती. याशिवाय, सोहमच्या वैयक्तिक आयुष्यात हस्तक्षेप करून त्याच्या मैत्रिणीला त्याच्याविरोधात भडकवण्याचा प्रयत्न होत असल्याचा संशयही त्याला होता. या सर्व घटनांमुळे निर्माण झालेली कटुता आणि वैमनस्य अखेर जीवघेण्या कटात परिवर्तित झाल्याचे पोलिसांचे प्राथमिक निष्कर्ष आहेत.
२१ मे रोजी रात्री कुवारबाव-साईनगर परिसरातील एका बंगल्याच्या मागील भागात सूरज झोरे याला बोलावून घेतल्याचा आरोप आहे. त्यानंतर धारदार कोयत्याने त्याच्यावर सपासप वार करण्यात आले. गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या सूरजला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे, मृत्यूशी झुंज देत असतानाच सूरजने पोलिसांना आरोपींची नावे सांगितल्याची माहिती तपासात समोर आली. त्यानंतर शहर पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने हलवत अवघ्या काही तासांत तिन्ही संशयितांना अटक केली होती.
पोलिस कोठडीनंतर न्यायालयीन कोठडी
या प्रकरणाच्या तपासासाठी न्यायालयाने यापूर्वी तिन्ही आरोपींना २ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. पोलिसांनी या कालावधीत आरोपींची कसून चौकशी करून घटनाक्रम, वापरण्यात आलेले हत्यार आणि गुन्ह्यामागील कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर मंगळवारी आरोपींना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने तिन्ही आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश दिले आहेत.

