(जाकादेवी / संतोष पवार)
रत्नागिरी तालुक्यातील जाकादेवी येथील रहिवाशी,जाकादेवी परिसरातील कर्तव्यदक्ष नागरिक म्हणून लौकिकास पात्र ठरलेले,जाकादेवी येथील सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखेचे कर्तव्यदक्ष निवृत्त कर्मचारी सुरेश सिताराम गुरव यांचे शुक्रवार दि.२७ मार्च रोजी वयाच्या ६४ व्या वर्षी हृदयविकाराने आकस्मिक दुःखद निधन झाले.
कै. सुरेश सिताराम गुरव हे अत्यंत कर्तव्यदक्ष, प्रामाणिक व सहकार्यशील व्यक्तिमत्व होते.
२८ नोव्हेंबर २०१३ रोजी झालेल्या जाकादेवी येथील सेंट्रल बँकेच्या दरोडाच्या वेळी जाकादेवी येथील सेंट्रल बँकेचे कर्मचारी सुरेश गुरव यांनी अतिशय धैर्याने कर्तव्य बजावत बंदूकीची गोळी झेलली होती. ते आपल्या कामाशी एकनिष्ठ होते. जाकादेवी बाजारपेठेसह परिसरात त्यांनी आपल्या कार्यशैलीची उत्तम छाप पाडली होती. ते मनमिळावू आणि कष्टाळू होते. मोठ्या हिमतीने त्यांनी आपला संसार फुलविला.आपल्या मुलांना त्यांनी उत्तम शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे केले.
कै. सुरेश गुरव हे मालगुंड एज्युकेशन सोसायटीचे सभासदही होते. जाकादेवीसह सैतवडे परिसरात ते अनेकांच्या मदतीला तत्परतेने धावून जात असत. त्यांनी आपल्या कोंडे गावात अड-अडचणीच्या वेळी लोकांना मदतीचा हात दिला. कै. सुरेश सिताराम गुरव यांच्या अकस्मात निधनाबद्दल जाकादेवी पंचक्रोशीतून दुःख व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी ,दोन मुलगे, तीन सुना भाऊ, पुतणे, नातू, नात असा परिवार आहे. कै. सुरेश सिताराम गुरव यांच्या अंत्ययात्रेत सर्व स्तरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

