(रत्नागिरी / प्रतिनिधी)
शहरात संतापजनक प्रकार घडला असून रिक्षात बसलेल्या आठ वर्षीय मुलाच्या हाताच्या मनगटावर चाकूने वार केल्याप्रकरणी एका संशयिताविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. महेश उदय यादव (वय ३६, रा. निवे बुद्रुक, सरोदेवाडी, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास कुवारबाव रेल्वे स्टेशन फाटा येथील माने पेट्रोल पंपासमोरील पानटपरीजवळ ही घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित महेश यादव आपल्या मुलगा तेज याला शांतीनगर येथून रिक्षामधून मारुती मंदिर परिसरातील खाऊगल्ली येथे घेऊन गेला होता. तेथे मुलाला सॅण्डविच आणि आईस्क्रीम खायला दिल्यानंतर तो पुन्हा घरी परतत होता. दरम्यान, त्याला महालक्ष्मी खेडशी येथे प्रवासी भाडे मिळाल्याने ते सोडून देण्यासाठी तो खेडशीकडे गेला. प्रवासी सोडून परत येत असताना त्याच्या पत्नीचा फोन आल्याने दोघांमध्ये फोनवर वाद झाला. या वादाच्या भरात संतापलेल्या यादवने कुवारबाव रेल्वे फाटा येथील माने पेट्रोल पंपासमोरील पानटपरीजवळ रिक्षा थांबवून रिक्षात बसलेल्या आपल्या मुलगा तेज महेश यादव (वय ८, रा. आजोळ केळवली, वरचीवाडी, ता. लांजा) याच्या हाताच्या मनगटावर चाकूने वार करून त्याला दुखापत केली.
या घटनेप्रकरणी फिर्यादी उमेश उदय यादव (वय ३७, रा. सावंतनगर, शांतीनगर, नाचणे, रत्नागिरी) यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीवरून संशयित रिक्षाचालकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

