(रत्नागिरी / प्रतिनिधी)
जागतिक स्तरावर निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीचे पडसाद आता स्थानिक बाजारपेठेत स्पष्टपणे उमटू लागले असून, त्याचा थेट फटका हॉटेल व्यवसायाला बसत आहे. इंधन आणि वायुपुरवठा साखळी विस्कळीत झाल्याने व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा ठप्प झाला आहे. परिणामी अनेक हॉटेल व्यावसायिकांना पर्यायी मार्गांचा अवलंब करत व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागत आहे.
व्यावसायिक गॅस उपलब्ध नसल्यामुळे शहरातील अनेक नामांकित हॉटेलांनी आपल्या मेन्यूकार्डमध्ये मोठी कपात केली आहे. कमी इंधनात तयार होणाऱ्या पदार्थांना प्राधान्य देत, अधिक वेळ आणि इंधन लागणारे पदार्थ तात्पुरते बंद करण्यात आले आहेत. काही ठिकाणी मेन्यूतील तब्बल पन्नास टक्के पदार्थ कमी करण्यात आल्याचे चित्र दिसून येत आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे कच्चे तेल आणि गॅस दरवाढीबरोबरच पुरवठा व्यवस्थेवरही परिणाम झाला आहे. भारतातील गॅस आयातीवर मर्यादा आल्याने इंधन कंपन्यांनी व्यावसायिक सिलिंडरचा पुरवठा नियंत्रित केला असून, रुग्णालये, वसतिगृहे आणि अत्यावश्यक सेवांना प्राधान्याने सिलिंडर उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यामुळे हॉटेल व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत.
परिस्थितीशी जुळवून घेत काही व्यावसायिकांनी इलेक्ट्रिक इंडक्शन शेगड्यांचा वापर वाढवला आहे, तर काहींनी पुन्हा पारंपरिक कोळशाच्या चुली पेटवल्या आहेत. मात्र या दोन्ही पर्यायांमुळे खर्चात वाढ होत असूनही ग्राहकांची सेवा खंडित होऊ नये, यासाठी तोटा सहन करून व्यवसाय सुरू ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. अनेक हॉटेलचालकांनी “हॉटेल बंद ठेवणे परवडणारे नाही; कमी पदार्थ असले तरी ग्राहकांना सेवा देणे आवश्यक आहे,” अशी भावना व्यक्त केली.
दरम्यान, पर्यटन हंगाम सुरू होत असल्याने शहरात पर्यटकांची वर्दळ वाढू लागली आहे. त्यामुळे येणाऱ्या पर्यटकांना किमान आवश्यक भोजन उपलब्ध करून देण्यावर हॉटेल व्यावसायिकांचा भर आहे. यासाठी स्पेशल चहा, विशेष स्नॅक्स आणि अधिक इंधन लागणारे पदार्थ तात्पुरते बंद करून साध्या, झटपट आणि कमी इंधनात तयार होणाऱ्या पदार्थांवर भर दिला जात आहे.
सध्याच्या प्रतिकूल परिस्थितीतही चूल पेटती ठेवत ग्राहकांचा विश्वास अबाधित राखण्याचा प्रयत्न करणाऱ्या हॉटेल व्यावसायिकांची ही धडपड लक्षवेधी ठरत आहे.

