(रत्नागिरी / प्रतिनिधी)
शहरातील रेल्वेस्थानक परिसरात शनिवारी पहाटे घडलेल्या चोरीच्या प्रकाराने सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा सवाल उपस्थित झाले आहेत. हॉटेललगत असणाऱ्या गणेश वडापाव सेंटर या गाडीवर ठेवलेला मोबाइल अज्ञात चोरट्याने क्षणात चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी उमेश प्रकाश सुर्वे (वय ५०, रा. वरची निवेंडी, सध्या रा. रेल्वे स्टेशन परिसर) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे.
फिर्यादी सुर्वे हे नेहमीप्रमाणे वडापावच्या गाडीवर उभे असताना त्यांनी मोबाइल बाजूला ठेवला. त्याच क्षणी किरकोळ वर्दळ असलेल्या ठिकाणी चोरट्याने संधी साधत मोबाइल लंपास केला. घटनेनंतर सुर्वे यांनी तत्काळ पोलिसांकडे धाव घेतली. शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू केला आहे.
दरम्यान, रेल्वे स्थानकासारख्या संवेदनशील भागात सकाळच्या शांत वेळेत घडलेली घटना पोलिसांच्या गस्त आणि कडक निरीक्षणाबाबत प्रश्न निर्माण करणारी ठरत आहे. अलीकडेच परिसरात वाढत्या चोरीच्या घटना नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण करत असून, चोऱ्यांना आळा घालण्यात पोलिस यंत्रणा हतबल ठरत असल्याचीही चर्चा आहे. नागरिकांमध्ये गर्दीच्या ठिकाणीही पोलिस हजेरी कमी, त्यामुळे चोरट्यांचे मनोबल वाढले आहे का? असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.

