(तेहरान / नवी दिल्ली)
मध्यपूर्वेतील वाढत्या तणावादरम्यान इराणने भारताला होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरक्षित रस्ता देण्याची हमी दिली आहे. भारत आणि इराणमध्ये मैत्रीचे संबंध असून भारताच्या जहाजांना होर्मुझमधून सुरक्षित रस्ता देणार, असे भारतातील इराणचे राजदूत मोहम्मद फतहाली यांनी शुक्रवारी इराणची भूमिका स्पष्ट करताना सांगितले.
इराणी राजदूत फतहाली नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते. इराण भारताला होर्मुझ सामुद्रधुनीतून रस्ता देईल का, असा प्रश्न पत्रकारांनी त्यांना विचारला असता ते म्हणाले, ‘इराण भारताच्या जहाजांना होर्मुझच्या सामुद्रधुनीसाठी नक्कीच सुरक्षित रस्ता देईल. कारण, भारत हा इराणचा मित्र देश आहे. पुढील दोन-तीन तासांच्या कालावधीत हा सुरक्षित मार्ग भारताला उपलब्ध झालेला असेल.’ भारत आणि इराणदरम्यान दीर्घ काळापासून सहकार्य सुरू असून एकमेकांप्रती विश्वासाची भावना असल्याचेही ते पुढे म्हणाले.
दरम्यान, ओमानच्या सोहर प्रांतात ड्रोन कोसळल्याने दोन भारतीय कामगारांचा मृत्यू झाला. ड्रोन हल्ल्याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलांना एक ड्रोन निकामी करण्यात यश आले. मात्र, ते कोसळताना ही दुर्घटना घडली.
दोन तेलवाहू टँकर्स रवाना
भारताच्या कच्च्या तेलाच्या आयातीपैकी सुमारे ४० टक्क्यांपेक्षा जास्त आणि एलपीजी आयातीपैकी ९० टक्के वाटा हा होर्मुझच्या सामुद्रधुनीतून येतो. आणखी दोन टँकर्स भारताकडे रवाना झाल्याचे वृत्त आहे. इराणच्या या निर्णयामुळे भारताचा इंधनपुरवठा सुरळीत व्हायला मदत मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने या घडामोडीचे स्वागत केले आहे.

