(पुणे)
हडपसर परिसरातील कामधेनू इस्टेटजवळ असलेल्या एका खासगी सुपर स्पेशालिटी रुग्णालयात बॉम्बसदृश वस्तू आढळल्याने दोन दिवसांपूर्वी मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा छडा लावत दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) नागपूर रेल्वे स्थानकावरून एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. प्राथमिक तपासात ही वस्तू बनावट असल्याचे स्पष्ट झाले असून, उपचारासाठी पैसे उकळण्याच्या उद्देशाने आरोपीने हा कट रचल्याचे समोर आले आहे.
पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने 10 तारखेला संबंधित रुग्णालयात उपचारासाठी नोंदणी केली होती. उपचाराचा खर्च परवडत नसल्याने त्याने रुग्णालयाकडून खंडणी उकळण्याचा प्लॅन आखला. त्यासाठी ऑनलाइन डिजिटल घड्याळ आणि इतर साहित्य खरेदी करून युट्यूबवरील व्हिडिओंच्या मदतीने बॉम्बसदृश उपकरण तयार करण्यात आले.
सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासातून आरोपीचा शोध
रुग्णालयाच्या शौचालयात संशयास्पद वस्तू आढळल्यानंतर पुणे पोलिसांनी आणि ATS ने तातडीने तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीची ओळख पटवण्यात आली. त्यानंतर आरोपीच्या घराची आणि दुकानाची झडती घेण्यात आली असता डिजिटल क्लॉकचे कव्हर आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले.
तपासादरम्यान आरोपी रेल्वेने नागपूरकडे पळून जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. अकोला पोलिसांच्या मदतीने त्याचा माग काढण्यात आला आणि अखेर नागपूर रेल्वे स्थानकावरून त्याला ताब्यात घेण्यात आले. आरोपीला पुण्यात आणण्याची प्रक्रिया सुरू असून रात्रीपर्यंत त्याला पुण्यात दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

बॉम्बमध्ये स्फोटकच नव्हते; दहशतवादी संबंध नसल्याचे स्पष्ट
पोलीस तपासात जप्त करण्यात आलेल्या उपकरणामध्ये कोणतेही स्फोटक साहित्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणाचा कोणताही दहशतवादी संबंध नसल्याचेही पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले. आरोपीचा यापूर्वी कोणताही गुन्हेगारी इतिहास नसल्याचेही तपासात समोर आले आहे. आरोपी मूळचा सोलापूर जिल्ह्यातील असून सध्या पुण्यातील मांजरी परिसरात राहत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याचे शूजचे दुकान असल्याचेही समोर आले आहे.
400 रुपयांत बनावट बॉम्ब, पण तपासासाठी लाखोंचा खर्च
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, आरोपीने अवघ्या 400 ते 500 रुपयांच्या साहित्यामध्ये ही बनावट बॉम्बसदृश वस्तू तयार केली होती. यात सुमारे 150 रुपयांचे स्मार्ट वॉच आणि काही इलेक्ट्रॉनिक साहित्याचा वापर करण्यात आला होता. या माध्यमातून रुग्णालयाकडून पैसे उकळून त्याच रुग्णालयात उपचार करण्याचा त्याचा उद्देश होता. दरम्यान, या बनावट बॉम्बप्रकरणामुळे गेल्या दोन दिवसांत मोठी पोलीस यंत्रणा सतर्क झाली होती. आरोपीचा शोध घेण्यासाठी आणि तपासासाठी सुमारे 4 ते 5 लाख रुपयांचा खर्च झाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

