(दापोली / प्रतिनिधी)
दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत कृषी महाविद्यालयातील एका सहयोगी प्राध्यापकावर विद्यार्थिनीच्या लैंगिक छळाच्या आरोपांनंतर विद्यापीठ प्रशासनाने शिस्तभंगाची कारवाई करत त्यांची सहायक प्राध्यापकपदी पदावनती केली असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात बदलीचे आदेश जारी केले आहेत.
दापोली कृषी महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थिनीने संबंधित प्राध्यापकाविरुद्ध १८ जुलै २०२५ रोजी कुलगुरूंकडे लैंगिक छळाची लेखी तक्रार दाखल केली होती. तक्रारीची गंभीर दखल घेत विद्यापीठ प्रशासनाने संबंधित प्राध्यापकाला तत्काळ निलंबित केले होते. त्यानंतर ६ ऑगस्ट २०२५ रोजी त्रिस्तरीय चौकशी समितीची नियुक्ती करून प्रकरणाची सखोल चौकशी सुरू करण्यात आली. समितीने सादर केलेल्या अहवालात संबंधित प्राध्यापकाने आपल्या पदाचा आणि अधिकाराचा गैरवापर केला असून शिक्षक-विद्यार्थी या विश्वासाच्या नात्याला तडा जाईल असे वर्तन केल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच हे कृत्य नैतिक अधःपतन दर्शविणारे, सेवा नियमांचे उल्लंघन करणारे आणि शासकीय सेवेस अशोभनीय असल्याचे स्पष्टपणे अधोरेखित करण्यात आले आहे.
या अहवालाच्या आधारे विद्यापीठाने संबंधित प्राध्यापकाची सहयोगी पदावरून सहायक प्राध्यापकपदी पदावनती केली असून त्यांची सिंधुदुर्ग जिल्ह्यात बदली करण्यात आली आहे. संबंधित प्राध्यापकाची सेवा केवळ दोन वर्षे शिल्लक असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, एका शिक्षकाच्या गैरवर्तनामुळे संपूर्ण शिक्षकवर्गाविषयी समाजात संशयाची भावना निर्माण होते, अशी खंत महाविद्यालयातील इतर प्राध्यापकांकडून व्यक्त केली जात आहे. शिक्षक या जबाबदार पदाला धक्का पोहोचविणाऱ्या अशा घटना दुर्दैवी असल्याचेही मत व्यक्त होत आहे. मात्र विद्यार्थिनीच्या लैंगिक छळासारख्या गंभीर आरोपांनंतर केवळ पदावनती आणि बदलीपुरतीच शिक्षा का, असा प्रश्नही शैक्षणिक वर्तुळातून उपस्थित केला जात आहे.

