(मुंबई)
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या तपासात आता गंभीर आणि धक्कादायक माहिती समोर येत आहे. या विमानाचे वैमानिक कॅप्टन सुमित कपूर यांचा उड्डाणाचा भूतकाळ अत्यंत वादग्रस्त असल्याचे उघड झाले आहे. तब्बल 15 हजार तासांचा अनुभव असूनही, यापूर्वी दोन वेळा ते दारूच्या नशेत ड्युटीवर आढळल्याची नोंद असल्याने तपासाला नवे वळण मिळाले आहे.
दारूच्या नशेत दोनदा ड्युटीवर
विमान उड्डाणापूर्वी वैमानिकाची ब्रेथ अॅनालायझर चाचणी बंधनकारक असते. नियमांनुसार दारूचा एक थेंबही गंभीर गुन्हा मानला जातो. मात्र, कॅप्टन सुमित कपूर यांच्या बाबतीत यापूर्वी दोन गंभीर घटना नोंदल्या गेल्या आहेत.
- 13 मार्च 2010 – दिल्ली विमानतळावर दिल्ली-बंगळुरू (S2-231) उड्डाणापूर्वी घेतलेल्या चाचणीत ते दारूच्या नशेत आढळले.
- 7 एप्रिल 2017 – सात वर्षांनंतर दिल्ली-गुवाहाटी (S2-4721) उड्डाणापूर्वी पुन्हा एकदा ते ‘लीकर पॉझिटिव्ह’ आढळले.
DGCA ची कडक कारवाई; तीन वर्षांचे निलंबन
दुसऱ्यांदा दोषी ठरल्यानंतर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) 24 एप्रिल 2017 रोजी कॅप्टन सुमित कपूर यांना तीन वर्षांसाठी निलंबित केले होते. व्यावसायिक वैमानिकासाठी ही शिक्षा अत्यंत कठोर मानली जाते. निलंबनाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांनी पुन्हा उड्डाण सुरू केले आणि ‘VSR व्हेंचर्स’ या खासगी ऑपरेटरमध्ये ते रुजू झाले. याच कंपनीकडे राज्यातील VVIP व्यक्तींच्या विमानसेवेची जबाबदारी होती.
पार्श्वभूमी तपासली गेली होती का?
उपमुख्यमंत्र्यांसारख्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची सुरक्षा ज्या पायलटकडे सोपवण्यात आली, त्याच्या पार्श्वभूमीची योग्य तपासणी झाली होती का, असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. दोनदा नियमभंग केलेल्या वैमानिकावर इतकी मोठी जबाबदारी देणे कितपत योग्य होते, यावर आता चर्चा सुरू झाली आहे.
मानवी चूक की निष्काळजीपणा?
बारामती विमानतळावर विमानाने पहिल्यांदा लँडिंग मिस केल्यानंतर ‘गो-अराउंड’ घेतला आणि त्याच वेळी अपघात झाला. या घटनेमुळे मानवी चूक, निर्णयक्षमतेतील त्रुटी किंवा पायलटच्या पूर्वीच्या सवयी यांचा या अपघाताशी संबंध आहे का, याचा तपास केला जात आहे. उपलब्ध माहितीनुसार, 2017 च्या निलंबनानंतर आवश्यक सर्व तांत्रिक चाचण्या पूर्ण करूनच सुमित कपूर यांनी पुन्हा उड्डाण प्रक्रिया सुरू केली होती. मात्र, त्यांच्या वर्तणुकीशी संबंधित बाबींकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप आता होत आहे.
खासगी ऑपरेटरवरही प्रश्नचिन्ह
या अपघातानंतर केवळ पायलटच नव्हे, तर संबंधित खासगी ऑपरेटरवरही प्रश्न उपस्थित झाले आहेत. नियमभंगाचा इतिहास असलेल्या वैमानिकाला VVIP फ्लाइट्सची जबाबदारी देण्यात आली कशी, याचे उत्तर तपास यंत्रणांना द्यावे लागणार आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, कॅप्टन सुमित कपूर हे विमान जगतातील एक अनुभवी व्यक्ती होते, ज्यांना १६,००० तासांपेक्षा जास्त उड्डाणाचा अनुभव होता. ते लिअरजेट्सचे तज्ज्ञ होते. सुमित कपूर यांनी सहारा, जेट एअरवेज आणि जेटलाइन सारख्या प्रमुख विमान कंपन्यांसाठी काम केले होते. त्यांना व्यावसायिक जेट, विशेषतः लिअरजेट्स उडवण्यात तज्ज्ञ मानले जात असे. दरम्यान, हा अपघात मानवी चूक होती की प्रणालीगत निष्काळजीपणाचा परिणाम, याचा सखोल तपास सुरू असून अंतिम अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

