(दापोली / रत्नागिरी)
शहरातील ‘दापोली फंड’ या नावाने सुरू असलेल्या बेकायदेशीर आर्थिक व्यवहारांचा मोठा प्रकार उघडकीस आला आहे. सार्वजनिक महामंडळातील काही अधिकारी आणि महिला कर्मचारी या फंडात सक्रिय सहभागी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सूज्ञ नागरिकांनी या प्रकरणाची लेखी तक्रार दापोलीचे पोलिस उपअधीक्षक यांच्याकडे दाखल केली असून, पोलिसांनी प्राथमिक चौकशीला सुरुवात केली आहे. दिवाळीपूर्वीच काही कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू झाल्याने शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील काही कर्मचारी ‘दापोली फंड’ या नावाने अनेक व्हॉट्सअॅप गटांच्या माध्यमातून नागरिकांकडून दरमहा एक हजार ते पाच हजार रुपयांपर्यंतची रक्कम गोळा करत होते. हे सर्व व्यवहार रोख स्वरूपात होत असून, या मार्गाने काही कोटी रुपयांची उलाढाल झाल्याची चर्चा आहे. दरवर्षी दिवाळीच्या आठवडाभर आधी हा फंड फोडला जातो आणि गुंतवणूकदारांना ‘गिफ्ट’ किंवा हप्त्यांच्या स्वरूपात परतावे दिले जातात. या फंडाचा मुख्य सूत्रधार म्हणून एका स्थानिक कर्मचाऱ्याचे नाव तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्याने या फंडातून मिळालेल्या पैशातून विविध मालमत्ता खरेदी केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या व्यवहारांना काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचा अप्रत्यक्ष पाठिंबा असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. यापूर्वी या संदर्भात एक अंतर्गत तक्रार दाखल झाली होती, मात्र ती दडपल्याचीही चर्चा आहे.
या फंडामुळे शहरात अनेकदा वाद, गोंधळ आणि हाणामारीच्या घटना घडल्या असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी काही महिला कर्मचाऱ्यांचीही चौकशी सुरू केली असून, आर्थिक गुंतवणुकीचा मागोवा घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ‘दापोली फंड’ प्रकरण चिपळूणमधील ‘टीडब्ल्यूजे’ घोटाळ्याच्या धर्तीवरच राबवले जात असल्याचे बोलले जात असून, यात सामान्य नागरिकांसह महामंडळ कर्मचाऱ्यांचेही लाखो रुपये अडकले असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या प्रकाराची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

