(दापोली)
दापोली तालुक्यातील मुरुड परिसरातील गव्हे ब्राह्मणवाडी येथे राहणारे संकेत हरिश्चंद्र पवार (वय ३४) यांचा वीजेच्या पोलवर काम करत असताना विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना आज (शुक्रवारी, २२ मे) रोजी सायंकाळी घडली. या अचानक झालेल्या दुर्घटनेमुळे गव्हे गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संकेत पवार हे गेली अनेक वर्षे वीज वितरण कंपनीच्या खाजगी ठेकेदाराकडे वायरमन म्हणून कार्यरत होते. मेहनती, शांत आणि जबाबदार स्वभावामुळे ते सहकारी तसेच ग्रामस्थांमध्ये परिचित होते. आज सकाळी ते नेहमीप्रमाणे आपल्या सहकाऱ्यांसोबत मुरुड परिसरात वीज दुरुस्ती आणि देखभाल कामासाठी गेले होते.
दिवसभर विविध ठिकाणी काम सुरू असताना सायंकाळच्या सुमारास संकेत पवार हे वीजेच्या पोलवर चढून तांत्रिक काम करत होते. त्याचवेळी अचानक त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला. या धक्क्यामुळे ते गंभीर जखमी झाले.
घटनेनंतर सहकाऱ्यांनी तातडीने मदतीसाठी धाव घेत त्यांना खाली उतरवले. उपचारासाठी हालचाल सुरू करण्यात आली होती. मात्र, त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.
या धक्कादायक घटनेची माहिती मिळताच परिसरात मोठी खळबळ उडाली. अनेक ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली होती. संकेत पवार यांच्या अकाली निधनामुळे पवार कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुले असा परिवार आहे. घरातील कर्ता व्यक्ती अचानक गेल्याने पवार कुटुंबीयांवर मोठा आघात झाला आहे.

