( नवी मुंबई )
नवी मुंबईतील बेलापूर सेक्टर 8 परिसरात भरधाव स्कॉर्पिओ कारने फुटपाथवरून चालणाऱ्या 19 वर्षीय तरुणीला जोरदार धडक दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघाताचा थरारक सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला असून त्यामध्ये कारने तरुणीसह अनेक वाहनांना धडक दिल्याचे दिसत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 13 मार्च रोजी सायंकाळी सुमारे 5.30 वाजण्याच्या सुमारास सेक्टर 8 मधील अरेंजर कॉर्नर परिसरात घडली. रस्त्याच्या कडेला फुटपाथवरून चालत असलेल्या तरुणीला पाठीमागून आलेल्या भरधाव स्कॉर्पिओने जोरदार धडक दिली. त्या वेळी तेथे एक दुचाकी उभी होती. स्कॉर्पिओने तरुणीला धडक दिल्यानंतर दुचाकीसह काही अंतर फरफटत नेले. यानंतर कारने पुढे जाऊन आणखी एका दुचाकीला, एका रिक्षाला तसेच पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या दोन ते तीन कारना धडक दिली. या अपघातात तीन ते चार वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.
अपघातानंतर स्थानिकांनी तातडीने धाव घेत तरुणीला कारखालून बाहेर काढले आणि तिला त्वरित बेलापूर येथील एमजीएम रुग्णालयात दाखल केले. सध्या तिच्यावर उपचार सुरू असून तिची प्रकृती गंभीर आहे.
दरम्यान, काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओमध्ये दोन तरुण असल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कारचालक आणि त्याच्या मित्राला ताब्यात घेतले. प्राथमिक माहितीनुसार, वाहन चालवताना चालकाचे अचानक नियंत्रण सुटले असावे. क्लचऐवजी एक्सेलेटरवर पाय गेल्यामुळे हा अपघात घडला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

