(मुंबई)
मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयात केवळ संशयाच्या आधारावर कोणालाही दोषी ठरवता येत नाही, असे स्पष्ट करत एका आरोपीची जन्मठेप रद्द केली आहे. ठोस आणि साखळीबद्ध पुरावे नसताना शिक्षा देणे योग्य नसल्याचे न्यायालयाने नमूद केले. न्यायमूर्ती मनिष पितळे आणि श्रीराम शिरसाट यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. “एक-दोन परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे आरोपीला दोषी ठरवता येत नाही. पुराव्यांची साखळी पूर्ण असणे आवश्यक आहे,” असे न्यायालयाने स्पष्ट केले.
काय होता निकाल?
ठाणे सत्र न्यायालयाने 2012 मध्ये आयपीसी कलम 302 अंतर्गत एका आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. मात्र उच्च न्यायालयाने हा निकाल रद्द करत आरोपीला निर्दोष मुक्त केले. केवळ संशय आणि अपूर्ण पुरावे यांच्या आधारे दिलेली शिक्षा टिकू शकत नाही, असे न्यायालयाने ठामपणे सांगितले.
प्रकरण काय आहे?
संजय पोखरकर असे आरोपीचे नाव आहे. एका 18 वर्षीय युवकाच्या हत्येप्रकरणी त्याला दोषी ठरवण्यात आले होते. संबंधित युवक मित्राच्या लग्नासाठी गेला होता, मात्र तो परत न आल्याने शोध घेतला असता त्याचा मृतदेह आढळला. या प्रकरणात पीडिताची सोनसाखळी आरोपीकडे सापडली होती. याच आधारावर सत्र न्यायालयाने त्याला दोषी ठरवले होते.
उच्च न्यायालयाने म्हटले की, आरोपीकडे सोनसाखळी सापडणे हा एकच पुरेसा पुरावा ठरत नाही. आरोपीने ती साखळी गहाण ठेवून कर्ज घेतल्याचा पुरावा देखील समोर आला आहे. त्यामुळे केवळ मुद्देमाल सापडल्यामुळे आरोपी हत्येसाठी जबाबदार ठरत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
हा निकाल न्यायव्यवस्थेत “संशयापेक्षा पुरावा महत्त्वाचा” या तत्त्वाला पुन्हा अधोरेखित करणारा आहे. गुन्हा सिद्ध करण्यासाठी मजबूत, सुसंगत आणि अखंड पुराव्यांची साखळी आवश्यक असल्याचे या निर्णयातून स्पष्ट झाले आहे.

