( रत्नागिरी )
यावर्षी हवामानातील बदलाचा मोठा फटका आंबा उत्पादनाला बसला असून आवक घटल्याने बाजारात दरात मोठी वाढ झाली आहे. सध्या आंब्याच्या एका पेटीला ६ हजार ते १० हजार रुपये असा विक्रमी दर मिळत आहे. कोकणातून सध्या केवळ ४०० ते ५०० पेट्यांचीच आवक होत असल्याची माहिती आंबा व्यावसायिक व संघटनेचे पदाधिकारी डॉ. विवेक भिडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले की, आंबा उत्पादन दिवसेंदिवस खालावत चालले आहे. त्यामुळे शासनाने केवळ घोषणा न करता बागायतदारांच्या अडचणी सोडवण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात.
या पत्रकार परिषदेला प्रकाश साळवी, तुकाराम घवाळी, राजन कदम, संजय हर्षे यांच्यासह अनेक बागायतदार उपस्थित होते.
डॉ. भिडे यांनी सांगितले की, आंबा पिकासाठी बागायतदारांनी घेतलेले कर्ज साधारण ६० कोटी रुपयांच्या घरात आहे. मात्र यंदा पीकच हाती नसल्याने हे कर्ज फेडणे अनेक बागायतदारांसाठी अशक्य झाले आहे. त्यामुळे सरकारने यावर्षीच्या आंबा पीक कर्जफेडीसाठी आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच पीक विमा योजनेचे निकष बदलण्याचीही गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. हे निकष बागायतदारांना विश्वासात घेऊन ठरवले गेले पाहिजेत, जेणेकरून त्यांचे नुकसान होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
हवामानातील सातत्यपूर्ण बदलामुळे यंदा अवघे २० टक्केच आंबा उत्पादन झाल्याचा अहवाल कृषी विभाग आणि कृषी विद्यापीठाने दिला आहे. याशिवाय आखाती प्रदेशातील युद्धाचा परिणाम आंबा निर्यातीवरही होत असल्याने बागायतदारांची चिंता वाढली आहे. त्यामुळे सरकारकडून ठोस मदतीची अपेक्षा बागायतदारांनी व्यक्त केली आहे.

