(रत्नागिरी / प्रतिनिधी)
शहरातील पेठकिल्ला परिसरातील नाईक फॅक्टरीसमोर एका भटक्या कुत्र्यावर अत्यंत क्रूर पद्धतीने अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कुत्र्याचे पाय दोरीने बांधून ठेवण्यात आले होते, त्याचे डोळे जखमी करण्यात आल्याचे दिसून आले असून डोक्यात खिळ्यासारखी वस्तू मारण्यात आल्याचा दिसून येत आहे. या घटनेमुळे प्राणीप्रेमी आणि नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
ही घटना दोन दिवसांपूर्वी घडल्याचे सांगितले जात असून, जखमी अवस्थेतील कुत्र्याचा व्हिडिओ सामाजिक कार्यकर्त्या संध्या कोसुंबकर यांनी त्यांच्या फेसबुक पेजवरून प्रसारित केला आहे. त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली. तसेच पोलिसांशी संपर्क साधून त्यांनाही घटनास्थळी बोलावून घेतले होते. कुत्र्याला झालेल्या गंभीर जखमा आणि त्याच्यावर करण्यात आलेल्या अमानुष कृत्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मुक्या प्राण्यांवर अशा प्रकारची क्रूरता करणाऱ्या प्रवृत्ती समाजासाठी धोकादायक असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.
या घटनेबाबत सामाजिक कार्यकर्त्या संध्या कोसुंबकर यांनी संताप व्यक्त करत संबंधित व्यक्तीचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. अशा प्रकारे एका निरपराध प्राण्याला लक्ष्य करणाऱ्या व्यक्तीचा वेळीच शोध घेणे आवश्यक असून, नागरिकांकडे याबाबत कोणतीही माहिती असल्यास ती तातडीने कळवावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. दरम्यान, या प्रकरणाची चौकशी करून दोषी व्यक्तीचा शोध घ्यावा आणि प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायद्यांतर्गत कठोर कारवाई करावी, अशी मागणी प्राणीप्रेमी संघटना आणि नागरिकांकडून होत आहे. या घटनेमुळे शहरात संतप्त भावना देखील आता व्यक्त केल्या जात आहेत.
काही वर्षांपूर्वीही भटक्या कुत्र्यांवरील क्रौर्याची घटना…
रत्नागिरीत काही वर्षांपूर्वीही भटक्या कुत्र्यांवरील क्रौर्याची अशीच एक धक्कादायक घटना उघडकीस आली होती. मारुती मंदिर परिसरापासून कारवांचीवाडीपर्यंतच्या पट्ट्यात अनेक भटके कुत्रे संशयास्पदरीत्या मृतावस्थेत आढळून आले होते. सलग काही दिवस शहराच्या विविध भागांत एकामागून एक कुत्र्यांचे मृतदेह सापडत असल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली होती. त्यावेळी अज्ञात व्यक्तीने विषारी पदार्थ देऊन या मुक्या प्राण्यांचा जीव घेतल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. या घटनेमुळे प्राणीप्रेमी आणि सामाजिक संघटनांनी तीव्र संताप व्यक्त करत दोषी व्यक्तींचा शोध घेण्याची मागणी देखील केली होती. मात्र, या प्रकरणाचा उलगडा झाला की नाही, याबाबत अनेक प्रश्न अनुत्तरितच राहिले आहे.

