(रत्नागिरी / प्रतिनिधी)
जिल्ह्यातील नागरिकांचे हरवलेले मोबाइल शोधून त्यांना परत मिळवून देण्यात रत्नागिरी पोलिसांनी उल्लेखनीय यश मिळवले आहे. मार्च २०२५ ते नोव्हेंबर २०२५ या कालावधीत हरवलेले एकूण १८७ मोबाइल फोन शोधून त्यांचे सुपूर्दगीपत्र कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक संजय दराडे यांच्या हस्ते मूळ मालकांना देण्यात आले.
पोलिस अधीक्षक नितीन बगाटे व अतिरिक्त पोलिस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलिस स्थानकाने ही मोहीम हाती घेतली होती. गहाळ मोबाइलची तपशीलवार माहिती गोळा करून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिस निरीक्षक स्मिता सुतार, पोलिस शिपाई अजिंक्य ढमढेरे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व पोलिस अंमलदारांनी एकत्रित टीम म्हणून काम केले. सायबर ट्रॅकिंग, तांत्रिक विश्लेषण व सातत्यपूर्ण पाठपुराव्याच्या आधारे या मोबाइलचा माग काढण्यात पोलिसांना यश आले.
मोबाइल सुपूर्द करताना विशेष पोलिस महानिरीक्षक संजय दराडे यांनी नागरिकांना सायबर गुन्ह्यांविषयी जागरूक राहण्याचे आवाहन केले. सायबर फसवणूक किंवा ऑनलाईन गुन्हा घडल्यानंतर विलंब न करता तत्काळ जवळच्या पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा. तातडीने दिलेली माहिती तपासासाठी अत्यंत महत्त्वाची ठरते, असे त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमाला पोलिस अधीक्षक नितीन बगाटे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक बी. बी. महामुनी, उपविभागीय पोलिस अधिकारी नीलेश माईनकर, लांजा उपविभागाचे अधिकारी सुरेश कदम तसेच पोलिस दलातील अधिकारी–कर्मचारी उपस्थित होते. जिल्हा पोलिसांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत असून तांत्रिक साधनांचा वापर करून हरवलेली मालमत्ता शोधण्यातील त्यांची कार्यकुशलता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

