(रत्नागिरी / प्रतिनिधी)
इराण-इस्राईल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर घरगुती एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण होणार असल्याच्या अफवांनी जिल्ह्यात काही ठिकाणी नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून, अनेकांनी गॅस एजन्सीबाहेर गर्दी केली आहे. मात्र जिल्ह्यात घरगुती गॅसचा साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध असून नागरिकांनी घाईगडबडीत सिलेंडर घेण्यासाठी रांगा लावण्याची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट करत पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना श्री. बगाटे यांनी सांगितले की, प्रत्येक कुटुंबाला आवश्यकतेनुसार घरगुती गॅस सिलेंडर नियमितपणे उपलब्ध करून देण्यासाठी पुरवठा यंत्रणा कार्यरत आहे. घरगुती वापराच्या सिलेंडरबाबत कोणतीही टंचाई नसून वितरण पूर्ववत सुरू राहणार आहे.
कमर्शियल वापराच्या सिलेंडरबाबत काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या असल्या तरी त्या दूर करण्यासाठी शासनस्तरावर आवश्यक हालचाली सुरू आहेत. यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना लवकरच प्राप्त होतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
गॅस वितरण सुरळीत राहावे यासाठी जिल्ह्यातील विविध गॅस एजन्सींना पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच ऑनलाईन वितरण व्यवस्था पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठीही प्रयत्न सुरू असून, नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी प्रशासन दक्ष असल्याचे त्यांनी नमूद केले. जिल्हाधिकारी आणि जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्क ठेवून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात असून, नागरिकांनी अफवांवर प्रतिक्रिया न देता संयम राखून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही पोलीस अधीक्षकांनी केले.

