(रत्नागिरी / प्रतिनिधी)
गणपतीपुळे ते जयगड या प्रमुख पर्यटन मार्गावरील केदारवाडी परिसरात सार्वजनिक रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने वाहने उभी केल्याप्रकरणी दोन वाहनचालकांविरुद्ध जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी सुनिता कृष्णा शेट्टी (रा. सानपाडा, दहिसर (पूर्व), मुंबई) आणि सुदेश चंद्रकांत साळवी (वय ५२, रा. भगतसिंग नगर-२, राजाराम गल्ली, लिंक रोड, मोतीलाल नगर, मुंबई) अशी गुन्हा दाखल झालेल्या वाहनचालकांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी (२४ जून) दुपारी साडेचारच्या सुमारास तसेच सायंकाळी पावणेसातच्या सुमारास केदारवाडी परिसरात दोन्ही वाहनचालकांनी सार्वजनिक रस्त्यावर वाहतुकीस व रहदारीस अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने वाहने उभी केली होती. त्यामुळे या मार्गावरील वाहतुकीत अडथळा निर्माण झाल्याचे निदर्शनास आले.
या प्रकरणी महिला पोलिस शिपाई अन्वी पुसाळकर तसेच पोलिस शिपाई निलेश गुरव यांनी स्वतंत्र तक्रारी जयगड पोलिस ठाण्यात दाखल केल्या. त्यानुसार संबंधित वाहनचालकांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास जयगड पोलिस करत आहेत. पर्यटन हंगामात गणपतीपुळे–जयगड मार्गावर वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. अशा परिस्थितीत सार्वजनिक रस्त्यावर बेशिस्त पार्किंगमुळे वाहतुकीचा खोळंबा होण्याबरोबरच अपघाताचा धोकाही वाढत असल्याने वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्यात यावे.

