( चिपळूण )
चिपळूण नगर परिषदेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश रामदास कदम यांनी दिले. नगराध्यक्ष उमेशदादा सकपाळ यांनी गुरुवारी मुंबई येथे त्यांच्या कार्यालयात भेट घेऊन या संदर्भात सविस्तर चर्चा केली.
यावेळी नगराध्यक्ष सकपाळ यांनी चिपळूण नगर परिषदेच्या घनकचरा व्यवस्थापनासाठी निधी मंजूर करण्याची मागणी लेखी निवेदनाद्वारे केली. तसेच घनकचरा व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी १६ इलेक्ट्रिक कचरा वाहने खरेदीसाठी आणि प्रकल्पातील विविध विकास कामांसाठीही निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली.
चिपळूण शहराचा वाढता विस्तार आणि वाढत्या कचऱ्याच्या प्रमाणामुळे सध्या उपलब्ध सुविधा अपुऱ्या पडत असल्याची बाब नगराध्यक्षांनी यावेळी निदर्शनास आणून दिली. विशेषतः शिवाजीनगर येथील घनकचरा प्रक्रिया केंद्रावर सुक्या कचऱ्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत असून त्यावर प्रक्रिया करण्यासाठी पुरेशा सुविधा नसल्याचे त्यांनी सांगितले.
या पार्श्वभूमीवर दररोज ५ टन क्षमतेचा गॅसिफिकेशन प्लांट उभारण्याचा प्रस्ताव नगर परिषदेकडून तयार करण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी १२ जून २०२५ रोजी दरपत्रक मागविण्याची सूचना प्रसिद्ध करण्यात आली होती. प्राप्त झालेल्या तीन दरपत्रकांपैकी सर्वात कमी दरानुसार ४ कोटी ९९ लाख ५५ हजार ३५७ रुपये इतके अंदाजपत्रक निश्चित करण्यात आले आहे. या कामाच्या तांत्रिक मान्यतेसाठी प्रस्ताव महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, ठाणे कार्यालयाकडे सादर करण्यात आला असल्याची माहितीही नगराध्यक्षांनी दिली.
या प्रकल्पासाठी आवश्यक निधी मंजूर करण्याची विनंती नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी केली असता, सिद्धेश कदम यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, “चिपळूण नगर परिषदेच्या विकासासाठी आम्ही ठामपणे पाठीशी आहोत. आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील,” अशी ग्वाही दिली.

