(चिपळूण /रत्नागिरी प्रतिनिधी)
गणेशोत्सवाच्या काळात कोकण रेल्वेमार्गावर प्रवाशांची अभूतपूर्व गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता, या कालावधीत रो-रो सेवा तसेच जड मालवाहतूक गाड्या तात्पुरत्या स्थगित कराव्यात, अशी मागणी कोकण विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष जयवंत दरेकर यांनी केली आहे. याबाबत त्यांनी कोकण रेल्वे प्रशासनाला निवेदन सादर केले आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेमार्गावर नियमित गाड्यांसह मोठ्या संख्येने विशेष रेल्वेगाड्या धावणार आहेत. त्यामुळे आधीच व्यस्त असलेल्या मार्गावरील वाहतुकीवर मोठा ताण येण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत मालवाहतूक गाडीला अपघात झाल्यास किंवा तांत्रिक कारणामुळे ती मार्गावर अडकल्यास प्रवासी रेल्वे वाहतूक विस्कळीत होऊन हजारो प्रवाशांना त्याचा फटका बसू शकतो, अशी भीती समितीने व्यक्त केली आहे. दरम्यान, २४ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे १० ते १०.३० वाजण्याच्या सुमारास गोव्यातील वेर्णा येथे ट्रक वाहून नेणाऱ्या रो-रो मालगाडीचे काही डबे रुळांवरून घसरल्याची माहिती समाजमाध्यमांवर प्रसारित झाली होती. या घटनेमुळे कोकण रेल्वेमार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाल्याचेही समोर आल्याचे दरेकर यांनी निवेदनात नमूद केले आहे. मात्र, या घटनेबाबत कोकण रेल्वेकडून अद्याप अधिकृत माहिती अथवा निवेदन प्रसिद्ध झालेले नाही.
गणेशोत्सवातील प्रवाशांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन १० ते १४ सप्टेंबर तसेच १७ ते २० सप्टेंबर या कालावधीत रो-रो सेवा आणि इतर जड मालवाहतूक गाड्या तात्पुरत्या स्थगित करण्याबाबत गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी समितीने केली आहे. उपलब्ध मार्गक्षमता शक्य तितकी नियमित तसेच विशेष प्रवासी गाड्यांसाठी राखून ठेवावी, असेही निवेदनात म्हटले आहे.
‘कोकण रेल्वेची विश्वसनीयता महत्त्वाची’
गणेशोत्सवाच्या काळात लाखो कोकणवासीयांसाठी कोकण रेल्वे ही अत्यंत महत्त्वाची वाहतूक व्यवस्था ठरते. त्यामुळे या काळात रेल्वेमार्गाची विश्वसनीयता, वेळपालन आणि प्रवासी सेवा अबाधित ठेवण्यासाठी संभाव्य अडथळे टाळण्याच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे, असे दरेकर यांनी निवेदनात म्हटले आहे.

