(रत्नागिरी / प्रतिनिधी)
किशोरवयीन मुलामुलींच्या आरोग्यविषयक जाणीवा अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत एकदिवसीय विभागीय कार्यशाळेचे आयोजन सोमवार, १६ मार्च २०२६ रोजी रत्नागिरी येथे करण्यात आले आहे. आरोग्य व कुटुंबकल्याण प्रशिक्षण केंद्र, कोल्हापूर यांच्या माध्यमातून ही कार्यशाळा पार पडणार असून सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. निपुण विनायक (भा.प्र.से.) यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
माळनाका येथील स्वयंवर मंगल कार्यालयात सकाळी १० वाजता कार्यशाळेला प्रारंभ होणार असून संध्याकाळी ५ वाजेपर्यंत विविध सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. किशोरवयीन आरोग्य, मानसिक स्वास्थ्य, पोषण, शारीरिक बदल, संवादकौशल्य आणि आरोग्यदायी जीवनशैली या विषयांवर संवादात्मक पद्धतीने मार्गदर्शन होणार आहे. कोल्हापूर आरोग्य सेवा परिमंडळांतर्गत रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सांगली या चार जिल्ह्यांतील प्रत्येकी २५ विद्यार्थ्यांचा या कार्यशाळेत सहभाग राहणार आहे. विशेष म्हणजे सार्वजनिक आरोग्य विभागाचे आयुक्त स्वतः किशोरवयीन मुलामुलींसोबत चर्चासत्रात सहभागी होऊन त्यांच्या प्रश्नांना थेट उत्तरे देणार आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातील १० ते १९ वयोगटातील २५ विद्यार्थी तसेच एक शिक्षक किंवा शिक्षिका यांना कार्यशाळेसाठी नामनिर्देशित करण्यात येणार असून संबंधितांना वाहतूक व भोजनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. किशोरवयीन आरोग्य संवर्धनासाठी राज्यस्तरावरून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यविषयक सजगता वाढण्यास आणि संवादासाठी सकारात्मक व्यासपीठ उपलब्ध होण्यास मदत होणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.

