(रायगड)
मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावर मासे वाहतूक करणारा ट्रक आज (शुक्रवारी) सकाळी उलटल्याची घटना घडली. बोरघाटातील अमृतांजन ब्रिजजवळ हा अपघात झाल्यामुळे काही काळ मुंबईकडे येणारी वाहतूक विस्कळीत झाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित ट्रक पुण्याहून मुंबईच्या दिशेने येत होता. बोरघाटातील उतारावर अमृतांजन ब्रिजजवळ पोहोचल्यावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक उलटून अपघात झाला. सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी झाली नसून दोन जण किरकोळ जखमी झाले. जखमींना उपचारासाठी खोपोली नगरपालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अपघाताची माहिती मिळताच आयआरबी पेट्रोलिंग, महामार्ग वाहतूक पोलीस (बोरघाट), डेल्टा फोर्स महाराष्ट्र सुरक्षा बल तसेच मृत्युंजय देवदूत पथकाने घटनास्थळी धाव घेत तात्काळ मदतकार्य सुरू केले.
अपघातग्रस्त ट्रक क्रेनच्या सहाय्याने बाजूला हटविण्याची प्रक्रिया सुरू असताना वाहतूक कोंडी टाळण्यासाठी काही काळ वाहतूक लोणावळा मार्गे जुन्या मुंबई–पुणे महामार्गावर वळविण्यात आली होती. त्यानंतर ट्रक सुरक्षित ठिकाणी हलवल्यानंतर एक्सप्रेसवेवरील वाहतूक पुन्हा पूर्ववत करण्यात आली असून सध्या मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. या अपघात प्रकरणाचा पुढील तपास खोपोली पोलीस करत आहेत.

