(मुंबई)
मागील काही वर्षांपासून इंजिनिअरिंग अभ्यासक्रमात प्रवेशासाठी मोठ्या प्रमाणावर जागा रिक्त राहात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी सेल) कक्षाने प्रवेशफेऱ्यांची संख्या तीनवरून वाढवून चार केली. मात्र, यंदाही परिस्थितीत फारसा बदल दिसला नाही. चार फेऱ्यांनंतरही जवळपास ६० हजार जागा रिक्त राहिल्या असून, त्या संस्थात्मक फेरीत भरण्याचे आव्हान आता महाविद्यालयांसमोर आहे.
चार फेऱ्यांनंतर १ लाख ४१ हजार ९०५ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. यंदा एकूण २ लाख २ हजार ६३८ जागांसाठी प्रवेशप्रक्रिया सुरू असून, त्यापैकी ६० हजार ७३३ जागा अद्याप रिक्त आहेत. आता या जागांसाठी संस्थात्मक स्तरावर १५ सप्टेंबरपर्यंत प्रवेश घेता येणार आहे.
विद्यार्थ्यांचा कल आधुनिक शाखांकडे
सीईटी सेलने दिलेल्या आकडेवारीनुसार, यंदा विद्यार्थ्यांचा कल सर्वाधिक कॉम्प्युटर इंजिनिअरिंग आणि माहिती तंत्रज्ञानाशी संबंधित अभ्यासक्रमांकडे आहे.
- कॉम्प्युटर इंजिनिअरिंग : ३२,१७१ पैकी २२,९५५ जागा भरल्या
- कॉम्प्युटर सायन्स अॅण्ड इंजिनिअरिंग : १९,८६० पैकी १५,२६३ प्रवेश
- आयटी (इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी) : १७,३११ पैकी १२,५२० प्रवेश
- यासोबतच आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय), डेटा सायन्स, मशीन लर्निंग यांसारख्या आधुनिक शाखांनाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.
पारंपरिक शाखांची घसरलेली लोकप्रियता
याउलट, पारंपरिक शाखांकडे विद्यार्थ्यांचा कल लक्षणीयरीत्या कमी झालेला दिसतो.
- मेकॅनिकल इंजिनिअरिंग : २३,८५३ पैकी १५,२३३ प्रवेश
- सिव्हिल इंजिनिअरिंग : १७,४५० पैकी १०,९३९ प्रवेश
- इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग : १३,६४९ पैकी केवळ ८,७१४ प्रवेश

