(पंढरपूर)
पंढरपूरमध्ये पार पडलेल्या कार्तिकी यात्रेचा रविवारी पारंपरिक सांगता विधी झाला. अखंड १७ दिवस २४ तास भाविकांना दर्शन देणाऱ्या श्री विठ्ठल आणि रुक्मिणीमातेला “शिणवटा पूजा” करून विश्रांती देण्यात आली. यानंतर मंदिरातील नेहमीचे नित्योपचार आणि राजोपचार पुन्हा सुरू करण्यात आले असून, विठुरायाला रविवारपासून नियमित निद्रा मिळाली आहे.
कार्तिकी यात्रेनंतर विठुरायाचा शिणवटा काढण्याची प्राचीन परंपरा आहे. या वेळी विठ्ठलाला गरम पाणी, दही-दूधाने स्नान घालण्यात आले आणि आयुर्वेदिक काढा देण्यात आला. “या पूजेनंतर देवाला आराम मिळतो आणि नित्योपचार पुन्हा सुरू होतात,” अशी माहिती श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.
पुण्यातील भाविक अमोल शेरे यांनी या प्रसंगी संपूर्ण मंदिराची सुंदर फुलांनी आरास केली होती. यात्रेच्या सांगतेनंतर मंदिरातील सर्व धार्मिक विधी पूर्ववत सुरू झाले आहेत.
गेल्या १७ दिवसांत विठुरायाचे २४ तास दर्शन सुरू असल्याने देवाचे नियमित नित्योपचार थांबवण्यात आले होते. या काळात विठ्ठलाच्या मूर्तीला आधार म्हणून पाठीमागे ‘लोड’ बसवण्यात आला होता. रविवारी शिणवटा पूजेदरम्यान भाविकांनी देवाच्या पायांना लिंबू आणि साखर चोळून दर्शन घेतले, थकलेल्या पायांच्या शिरा मोकळ्या व्हाव्यात, अशी श्रद्धाळूंची भावना आहे. यानंतर ब्रह्मवृंदाच्या रुद्रावर्तनाच्या घोषात विठुरायाला दही, मध, साखर आणि दुधाचा अभिषेक शंखातून करण्यात आला. पंचामृत स्नानानंतर देवाला केशरमिश्रित गरम पाण्याने स्नान घालण्यात आले. देवाच्या थकलेल्या शरीराला उत्साह मिळावा, असा वारकरी संप्रदायाचा श्रद्धाभाव आहे.
स्नानानंतर विठुरायाला आकर्षक पोशाख आणि हिरे-माणिकांच्या दागिन्यांनी सजविण्यात आले. सुवर्ण मुकूट, कौस्तुभ मणी, भाळी निळ्या हि-यांचा नाम, गळ्यात मोहरांच्या आणि पुतळ्यांच्या माळा, तीन पदरी सुवर्ण तुळसहार, तसेच कानात हिरेजडीत मत्स्य जोड अशा अलंकारांनी विठुरायाचे सौंदर्य खुलून दिसले. रुक्मिणीमातेलाही पारंपरिक वाक्या, तोडे आणि मोहरांच्या माळांनी सजविण्यात आले.
शिणवटा पूजेच्या निमित्ताने मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती. “विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल” च्या जयघोषात सर्व विधी पार पडले आणि यात्रेचा सांगता उत्साही व भक्तिभावाने झाला.

