(मुंबई)
दसऱ्याच्या शुभदिनी मुंबईतील शिवतीर्थावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा भव्य मेळावा पार पडला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शस्त्रपूजन करुन शिवसैनिकांना संबोधित केले. या कार्यक्रमाला खासदार संजय राऊत, आमदार आदित्य ठाकरे, अंबादास दानवे, माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि शिवसेनेचे अन्य बडे नेते उपस्थित होते. मुसळधार पावसातही शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते, तसेच मैदानात चिखल असताना लाकडी फळ्या आणि कापड वापरून पाण्याचा निचरा केला गेला, जेणेकरून मेळावा सुरळीत पार पडला.
दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर अनेकांचे लक्ष उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यातील युतीकडे लागले होते. मात्र, राज ठाकरे हे यंदा मेळाव्यात उपस्थित राहणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. उद्धव ठाकरे हे राज ठाकरे आणि युतीबद्दल मेळाव्यात काय बोलतील? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. अखेर उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्याबद्दल मेळाव्यात बोलले आहेत.उद्धव ठाकरे यांनी युतीसंदर्भात सांगितले की, “मी आणि राज एकत्र येणार का? असे कुणीतरी बोलले. पण आम्ही पाच जुलै रोजी एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी, जिथे माझ्या मातृभाषेचा घात होत असेल, तिथे मी मराठी माणसामध्ये फूट पडून देणार नाही.” या विधानातून त्यांनी युतीसंदर्भातील संकेत दिले.
असली सोनं माझ्याकडे…
उद्धव ठाकरे म्हणाले, आपल्या परंपरेप्रमाणे सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा… विजयादशमीच्या शुभेच्छा. अशी जीवाला जीव देणारी माणसं हेच आयुष्यातील करं सोनं असतं. अनेक पक्षांचं आपली शिवसेना फोडण्याकडे लक्ष असतं. त्यांना असं वाटलं काही जणांना त्यांनी पळवलं आहे… पण जे पळवलं ते पितळ होतं खरं सोनं माझ्याकडे आहे.
उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर टीका करत शेतकऱ्यांसाठी मदतीचे आवाहन केले. त्यांनी सांगितले, “जनतेच्या आयुष्याचा चिखल केला जात आहे. शेतकऱ्यांच्या घरादाराचा चिखल झाला आहे. सर्व शिवसैनिकांना आवाहन आहे की शेतकऱ्यांना 50 हजार रुपये मदत केली पाहिजे. आम्ही सर्व निकष बाजूला ठेवत कर्जमाफी केली होती.”
मराठी भाषेवर होणाऱ्या आघाताबाबतही उद्धव ठाकरे यांनी ठणकावून बोलले. “आमचा हिंदीला विरोध नाही, पण आमच्यावर हिंदीची सक्ती करायची नाही. मराठी भाषेला महाराष्ट्र मिळाले, पण महाराष्ट्राला राजधानी नव्हती. नंतर मराठी माणसाने रक्त सांडून मुंबई मिळवली. ती मुंबई व्यापाऱ्यांच्या खिशात जात असेल तर खिसा फाडून आम्ही मुंबई राखल्याशिवाय राहणार नाही,” असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
शिवसेना दसरा मेळावा यंदा ठाकरेंच्या वर्चस्वाखाली पार पडला. मुख्य स्टेजवर बाळासाहेब ठाकरे आणि मीनाताईंचे भव्य फोटो तसेच आदित्य आणि उद्धव ठाकरे यांचे फोटो लावले गेले होते. ‘विचार ठाकरेंचा, आवाज महाराष्ट्राचा’ या बॅनरखाली शिवसैनिकांनी उत्साहात सहभाग घेतला.
यंदा पावसाच्या साथीनं हा दसरा मेळावा पार पडल्याने शिवतीर्थवर उपस्थित शिवसैनिकांच्या उत्साहात काहीच कमतरता झाली नाही. स्थानिक आमदार-खासदार आणि विभाग प्रमुखांच्या प्रयत्नांमुळे कार्यक्रम सुरळीत पार पडला.

