(रत्नागिरी / प्रतिनिधी)
कोकण रेल्वे प्रवासी सल्लागार समितीची २३ वी बैठक ६ मार्च रोजी नवी मुंबई येथे पार पडली. या बैठकीस महाराष्ट्र, गोवा व कर्नाटक येथील समिती सदस्य तसेच कोकण रेल्वेचे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स उपस्थित होते.
या बैठकीत प्रवासी सल्लागार समिती सदस्य सचिन वहाळकर यांनी रत्नागिरी स्थानकासाठी कोकणकन्या, मांडवी एक्सप्रेस, जनशताब्दी एक्सप्रेस आणि वंदे भारत या गाड्यांमधील आरक्षण कोटा वाढविण्याचा मुद्दा पुन्हा उपस्थित केला. यापूर्वी झालेल्या बैठकीत या वाढीस मान्यता मिळाली होती, मात्र त्याची अंमलबजावणी झालेली नव्हती.
दरम्यान, या निर्णयाची अंमलबजावणी मे महिन्यापासून करण्यात येणार असून ५ मार्च रोजी पीआरएस टर्मिनलवर आवश्यक सुधारणा करण्यात आल्या आहेत. त्यानुसार कोकणकन्या व मांडवी एक्सप्रेसमध्ये 2AC, 3AC आणि 3E या वर्गांमध्ये सुमारे ५० टक्के तर स्लीपर वर्गात २५ टक्के कोटा वाढविण्यात आला आहे. तसेच जनशताब्दी एक्सप्रेसच्या चेअर कार आणि सेकंड सिटिंग वर्गात तसेच वंदे भारत एक्सप्रेसच्या चेअर कारमध्येही कोटा वाढ करण्यात आली आहे.
या निर्णयाचा फायदा रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण आणि खेड परिसरातील प्रवाशांना होणार आहे. हा कोटा मडगाव येथून रत्नागिरी स्थानकाकडे वर्ग करण्यात आला आहे. ही मागणी मान्य केल्याबद्दल सचिन वहाळकर यांनी कोकण रेल्वेचे वाणिज्य प्रबंधक आशुतोष श्रीवास्तव तसेच सीएमडी संतोषकुमार झा यांचे आभार मानले. भविष्यात हा कोटा टप्प्याटप्प्याने वाढविण्याबाबतही प्रशासनाने सकारात्मक भूमिका दर्शवली आहे.
बैठकीत कोकण रेल्वे मार्गावरील विस्कळीत वेळापत्रकाचाही मुद्दा सचिन वहाळकर यांनी उपस्थित केला. अनेक गाड्या उशिराने धावत असून तेजस एक्सप्रेससारख्या प्रीमियम गाडीचे वेळापत्रकही विस्कळीत झाले असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. यावर प्रशासनाने मार्गावरील देखभाल कामे, वाढलेली गाड्यांची संख्या तसेच मुंबई व पनवेल येथील मध्य रेल्वेच्या ब्लॉकमुळे विलंब होत असल्याचे स्पष्ट केले. ही कामे पूर्ण झाल्यानंतर गाड्यांचा उशीर कमी होईल, तसेच तेजस एक्सप्रेसचे वेळापत्रक पुन्हा पूर्ववत करण्याला प्राधान्य दिले जाईल, असे आश्वासन देण्यात आले.
यावेळी रत्नागिरी–दिवा गाडी पुन्हा दादरपर्यंत नेण्याची मागणीही करण्यात आली. हा विषय मध्य रेल्वेच्या अखत्यारीत असल्याने त्या स्तरावर निर्णय अपेक्षित असल्याचे प्रशासनाने सांगितले. दरम्यान, दिव्यावरून ही गाडी उशिरा सुटत असल्याने रत्नागिरीत पोहोचण्यास विलंब होतो. त्यामुळे गाडी लवकर सोडण्याबाबत मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांसोबत लवकरच बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले.
रत्नागिरी स्थानकावरील दुचाकी पेड पार्किंगसाठी शेड उभारणे, पार्किंग जागेत पट्टे व सूचना फलक लावणे या मागण्याही बैठकीत मांडण्यात आल्या. त्यावर कोकण रेल्वेचे सीएमडी संतोषकुमार झा यांनी तात्काळ कार्यवाहीचे निर्देश देत पार्किंग शेडसाठी आर्थिक तरतूद करण्याबाबत मुख्य अभियंता प्रकाश यांना सूचना दिल्या.
तसेच वांद्रे टर्मिनस ते मडगाव दरम्यान धावणाऱ्या गाडीला खेड येथे थांबा देण्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठविण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला.
या बैठकीस महाराष्ट्र विधानसभेचे प्रतिनिधी म्हणून आमदार संजय केळकर तसेच संसद प्रतिनिधी म्हणून खासदार अनुप धोत्रे उपस्थित होते. यावेळी कोकण रेल्वेच्या आगामी प्रकल्पांबाबत, आर्थिक स्थिती, प्रवासी व मालवाहतूक गाड्या तसेच रो-रो सेवेसंदर्भात प्रशासनाकडून सविस्तर सादरीकरण करण्यात आले.
वैभववाडी–कोल्हापूर या प्रस्तावित रेल्वे मार्गाबाबतही चर्चा झाली. हा प्रकल्प भारतीय रेल्वेकडून राबविण्यात येणार असला तरी त्याची अंमलबजावणी कोकण रेल्वेला देण्यात आल्यास महामंडळाला फायदा होईल, अशी भूमिका सीएमडी संतोषकुमार झा यांनी मांडली.

