(रत्नागिरी / जिमाका)
घरगुती गॅस पुरवठ्याबाबत जिल्ह्यात पसरत असलेल्या अफवा निराधार असून प्रत्येक ग्राहकाला २५ दिवसांच्या आत गॅस सिलेंडर उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिले. जिल्ह्यात घरगुती गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याने नागरिकांनी कोणत्याही प्रकारे घाबरून जाऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले.
जिल्हाधिकारी जिंदल यांनी आज रत्नागिरी येथील शांतादुर्गा गॅस एजन्सीला भेट देऊन तेथील व्यवस्थापनाची पाहणी केली. यावेळी त्यांनी एजन्सी व्यवस्थापन तसेच उपस्थित ग्राहकांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
या भेटीदरम्यान त्यांनी एजन्सी व्यवस्थापनाला बुकींगसंदर्भातील माहिती दर्शनी भागात फलकाद्वारे स्पष्टपणे लावण्याच्या सूचना दिल्या. तसेच ग्राहकांचे फोन तातडीने स्वीकारून त्यांना समाधानकारक उत्तरे द्यावीत, त्यांच्या शंकांचे निरसन करावे आणि प्रलंबित बुकींग कमी करण्यासाठी योग्य नियोजन करावे, असे निर्देशही दिले.
माध्यमांशी बोलताना जिल्हाधिकारी जिंदल म्हणाले की, काही दिवसांपासून घरगुती गॅस पुरवठा ४५ दिवसांनी होतो, अशी माहिती समाजमाध्यमांवर फिरत आहे; मात्र ती चुकीची आहे. शासनाच्या निर्देशानुसार प्रत्येक ग्राहकाला २५ दिवसांच्या आत गॅस सिलेंडर मिळणे आवश्यक आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व गॅस एजन्सींना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.
४५ दिवसांचा विलंब होण्यामागील काही तांत्रिक अडचणी आजच निकाली निघतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. ग्राहकांनी कोणतीही समस्या असल्यास जिल्हा नियंत्रण कक्षाच्या ७०५७२२२२३३ या क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच सिलेंडर बुकींगसाठी गॅस एजन्सींच्या व्हॉट्सॲप क्रमांकांचा वापर करावा, असेही त्यांनी सांगितले.
या वेळी जिल्हा पुरवठा अधिकारी रोहिणी रजपूत तसेच तहसीलदार राजाराम म्हात्रे उपस्थित होते.

