(रत्नागिरी)
शहरातील घुडेवठार परिसरात किरकोळ वादातून टेंपोचालकाला बेदम मारहाण केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुधीर घुडे, बाबू घुडे आणि एक अज्ञात व्यक्ती अशी संशयितांची नावे असून गुरुवारी (ता. १३) सकाळी साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली.
फिर्यादी गौरव सदानंद चव्हाण (४०, रा. कर्ला भंडारवाडी, रत्नागिरी) हे आपल्या ताब्यातील टेंपो (एमएच-०८-एपी-३७३२) मधून माळनाका येथून माल घेऊन क्लिनर नरेश थापा व हमाल संदीप पाटील यांच्यासह घुडेवठार येथील गोवेकर यांच्या दुकानाकडे आले होते. तेथे माल खाली करण्याच्या तयारीत असताना रिक्षाचालक सुधीर घुडे अचानक त्या ठिकाणी आला. काही दिवसांपूर्वी फिर्यादीच्या टेंपोने त्याच्या रिक्षेला धक्का लागल्याचा राग मनात ठेवून त्याने गौरव चव्हाण यांना हाताबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर तो तिथून निघून गेला.
काही वेळाने घुडे पुन्हा आपल्या रिक्षातून इतर दोघांना घेऊन तेथे आला. यावेळी त्याने हातातील लोखंडी कड्याने चव्हाण यांच्यावर हल्ला चढवला. यामुळे चव्हाण खाली कोसळले असता तिघांनी मिळून त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. मध्यस्थी करण्यास आलेल्या क्लिनर आणि हमाललाही मारहाण व शिवीगाळ करण्यात आली. तसेच ठार मारण्याच्या धमक्याही दिल्या, अशी तक्रार फिर्यादीने पोलिसांत नोंदवली आहे. या प्रकरणी शहर पोलिसांनी तिघांविरुद्ध मारहाण, धमकी आणि संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.

