(गावखडी / वार्ताहर)
साधे राहणीमान आणि उच्च विचारसरणी या मूल्यांनुसार जीवन जगणारे रत्नागिरी तालुक्यातील शिवार आंबेरे येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. जितेंद्र शिर्सेकर आणि त्यांची पत्नी सौ. संजीवनी जितेंद्र शिर्सेकर यांनी आपल्या विवाहाच्या रौप्य महोत्सवी वाढदिवसानिमित्त समाजाभिमुख उपक्रम राबवून एक आदर्श घालून दिला.
आपल्या २५ व्या विवाह वाढदिवसानिमित्त त्यांनी समाजाप्रती कृतज्ञता व्यक्त करत सुमारे १०० ज्येष्ठ महिलांना ब्लॅंकेट वाटप केले. ६५ वर्षांवरील महिलांना मायेची उब आणि आधार मिळावा, या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला.
आज अनेक जण वाढदिवस मोठ्या खर्चात आणि दिमाखात साजरे करतात; मात्र तोच खर्च समाजोपयोगी कार्यासाठी वापरला गेला तर गरजू लोकांना आधार मिळू शकतो, या विचारातून शिर्सेकर दाम्पत्याने हा उपक्रम हाती घेतला. वृद्धाश्रमांची वाढती संख्या लक्षात घेता ज्येष्ठ नागरिकांना सन्मानाने आणि आधाराने जगता यावे, हा या उपक्रमामागील प्रमुख हेतू होता.
श्री. जितेंद्र शिर्सेकर हे गेली अनेक वर्षे विविध सामाजिक उपक्रमांमधून समाजकार्य करत आहेत. त्यांनी शिवार आंबेरे येथे पाच वर्षे सरपंच म्हणून काम पाहिले असून दहा वर्षे उपसरपंच आणि दहा वर्षे ग्रामपंचायत सदस्य म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. त्यांची पत्नी सौ. संजीवनी शिर्सेकर यांनीही दहा वर्षे सरपंच पद भूषवून ग्रामविकासात योगदान दिले आहे.
या रौप्य महोत्सवी विवाह वाढदिवसानिमित्त राबविलेल्या सामाजिक उपक्रमामुळे शिर्सेकर दाम्पत्याने समाजासमोर प्रेरणादायी आदर्श उभा केला असून जिल्हाभरातून त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
यावेळी शिवार आंबेरेचे पोलीस पाटील श्री. सुरेश लक्ष्मण नाटेकर, गोपाळ रोकडे, दयानंद लाखण, राम गुरव यांच्यासह अनेक महिला उपस्थित होत्या.
फोटो : शिवार आंबेरे येथे विवाहाच्या रौप्य महोत्सवी वाढदिवसानिमित्त श्री. जितेंद्र शिर्सेकर यांनी महिलांना ब्लॅंकेट वाटप करताना सौ. संजीवनी जितेंद्र शिर्सेकर व उपस्थित मान्यवर.
(छाया : दिनेश पेटकर, गावखडी)

