(रत्नागिरी / वार्ताहर)
कोकणच्या मातीतील शब्दांना निसर्गाचा गंध आणि समुद्राच्या लाटांची गाज लाभली आहे. आजच्या धावपळीच्या आणि तंत्रज्ञानप्रधान युगात माणसाला माणसाशी जोडून ठेवण्याचे, तसेच जगण्याचा खरा अर्थ शिकवण्याचे सामर्थ्य केवळ साहित्यात आहे, असे भावस्पर्शी प्रतिपादन जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी केले.
आधुनिक मराठी काव्याचे जनक आणि मराठी साहित्याला ‘तुतारी’च्या माध्यमातून नव्या युगाची पहाट दाखवणारे कवी केशवसुत यांच्या जन्मभूमी मालगुंड येथे कोकण मराठी साहित्य परिषदेच्या १८ व्या मध्यवर्ती कोकण मराठी साहित्य संमेलनाच्या ध्वजाचे आणि बोधचिन्हाचे अनावरण प्रशांत सातपुते यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या केंद्रीय अध्यक्ष नमिता कीर, केंद्रीय कार्याध्यक्ष प्रा. डॉ. प्रदीप ढवळ, संमेलनाचे कार्यवाह गजानन पाटील, कार्याध्यक्ष अभिजित हेगशेट्ये, माध्यमिक शिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे, उपशिक्षणाधिकारी संदेश कडव, शिक्षण विस्तार अधिकारी महेश कांबळे आणि माजी पंचायत समिती सभापती प्रकाश साळवी आदी उपस्थित होते.
साहित्यध्वज संवेदनशीलतेला साद घालणारा
ध्वज आणि बोधचिन्ह हे केवळ कापडाचा तुकडा किंवा चित्र नसून साहित्य, संस्कृती, विचार आणि रसिकतेचे प्रतीक आहे. साहित्यध्वज आकाशात डोलू लागतो, तेव्हा तो केवळ संमेलनाची घोषणा करत नाही, तर माणसाच्या अंतःकरणातील संवेदनशीलतेलाही साद घालतो. या अनावरण सोहळ्यामुळे आगामी संमेलनाच्या आयोजनाची मंगल सुरुवात झाली आहे, असे प्रशांत सातपुते यांनी सांगितले.
कोकण मराठी साहित्य परिषदेने अनेक वर्षांपासून कोकणचा सांस्कृतिक आणि भाषिक वारसा जपला आहे. कवी केशवसुत यांच्या स्मारकाच्या साक्षीने आयोजित होणारे हे संमेलन नवे विचार, संवाद आणि साहित्यप्रेमींचा सहभाग वाढवणारे ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. आगामी संमेलनाच्या साहित्यध्वजाखाली सर्वांनी एकत्र येऊन शब्द, विचार आणि संस्कृतीचा भव्य सोहळा साकारावा, असे आवाहन त्यांनी केले.
२७ ते २९ नोव्हेंबरला मालगुंडमध्ये साहित्यपर्व
कोकण मराठी साहित्य परिषदेचे १८ वे मध्यवर्ती मराठी साहित्य संमेलन २७, २८ आणि २९ नोव्हेंबर २०२६ रोजी मालगुंड येथे होणार आहे. कवी केशवसुत स्मारकाच्या परिसरात रंगणाऱ्या या साहित्य सोहळ्यात राज्यभरातील नामवंत साहित्यिक, कवी, समीक्षक आणि वाचक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
तरुणांमध्ये वाचन-लेखनाची आवड निर्माण व्हावी : नमिता कीर
साहित्य माणसाला जगण्याचा विचार देते आणि जीवन अधिक सुंदर बनवते. त्यामुळे साहित्य संमेलने केवळ शहरांपुरती मर्यादित न राहता ग्रामीण भागातील तळागाळापर्यंत आणि नव्या पिढीतील तरुणांपर्यंत पोहोचली पाहिजेत, असे मत कोकण मराठी साहित्य परिषदेच्या केंद्रीय अध्यक्ष नमिता कीर यांनी व्यक्त केले.
कोमसापने गेल्या ३५ वर्षांच्या प्रवासात मॉरिशस आणि कॅनडासारख्या देशांमध्येही साहित्य संमेलने आयोजित करून जागतिक स्तरावर आपली ओळख निर्माण केली आहे, असे त्यांनी सांगितले. १९९१ मध्ये अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या वेळी ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांनी कवी केशवसुत यांच्या स्मारकाची उभारणी आणि कोमसापच्या स्थापनेचा संकल्प याच भूमीतून केला होता, याची आठवणही त्यांनी करून दिली.
तरुणांच्या हातात लेखणी देऊन त्यांना साहित्याच्या माध्यमातून आपले विचार व्यक्त करण्यासाठी प्रोत्साहित करणे, हा अशा संमेलनांचा प्रमुख उद्देश असल्याचे कीर यांनी स्पष्ट केले. आगामी संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ विज्ञान लेखक डॉ. बाळ फोंडके असल्याने तंत्रज्ञानाच्या वर्तमान युगात साहित्य आणि विज्ञान यांचा सुरेख संगम या संमेलनातून अनुभवायला मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
संमेलन संस्मरणीय करण्याचा प्रयत्न : अभिजित हेगशेट्ये
मालगुंड येथील कवी केशवसुत स्मारकात आयोजित होणारे साहित्य संमेलन अखिल भारतीय स्तरावरील संमेलनाच्या दर्जाचे व्हावे, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे कार्याध्यक्ष अभिजित हेगशेट्ये यांनी सांगितले. शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थी आणि तरुण पिढीला साहित्याशी जोडण्यासाठी विविध संस्थांच्या माध्यमातून विशेष ग्रंथदिंडी आयोजित केली जाणार आहे.
या संमेलनाला उपमुख्यमंत्री, आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यवर आणि महाराष्ट्रातील ज्येष्ठ साहित्यिक उपस्थित राहणार असल्याने हा साहित्य सोहळा ऐतिहासिक ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
साहित्य आणि वाचनसंस्कारांतून भाषेचे संवर्धन आवश्यक : प्रा. डॉ. प्रदीप ढवळ
वर्गखोल्या आणि अभ्यासक्रमाच्या पलीकडे जाऊन नव्या पिढीला घडवण्यासाठी साहित्य आणि वाचनाचे संस्कार रुजवणे आवश्यक आहे, असे मत महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष प्रा. डॉ. प्रदीप ढवळ यांनी व्यक्त केले.
३ ऑक्टोबर २०२४ रोजी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे ही अभिमानास्पद बाब असून, त्यानंतर राज्यभरात मराठी भाषेचा जागर अधिक वेगाने सुरू झाला आहे, असे त्यांनी सांगितले. परिवहन विभाग आणि मराठी भाषा विभागाच्या सहकार्याने सुमारे १ लाख ६० हजारांहून अधिक अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना दैनंदिन व्यवहारासाठी उपयुक्त ठरेल अशी सुलभ मराठी शिकवण्याचा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाल्याचेही त्यांनी नमूद केले.
आगामी साहित्य संमेलनाला ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ आणि विज्ञान लेखक डॉ. बाळ फोंडके यांच्यासह मॉरिशसच्या राजदूत शीला बापू उपस्थित राहणार आहेत. शीला बापू या मूळच्या सावंतवाडीच्या आहेत.
कार्यक्रमात संमेलनाचे कार्यवाह गजानन पाटील यांनी प्रास्ताविकातून आयोजनाची माहिती दिली, तर माधव अंकलगे यांनी सूत्रसंचालन केले.


