(रत्नागिरी / वार्ताहर)
नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य संतोष थेराडे यांनी स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेला सदिच्छा भेट दिली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी त्यांचा यथोचित सन्मान केला.
जिल्हा परिषद निवडणुकीत मिळालेल्या दणदणीत विजयाबद्दल अभिनंदन करताना ॲड. दीपक पटवर्धन म्हणाले, हा कौल जनतेच्या विश्वासाचा स्पष्ट संकेत आहे. जनसामान्यांशी असलेली थेट नाळ, निष्ठावंत कार्यकर्त्यांचे पाठबळ आणि सातत्यपूर्ण कामगिरी याचीच ही पावती आहे. या विजयामुळे संतोष थेराडे यांनी लोकमानसात आपले स्थान अधिक ठाम केले आहे.
राजकारणापलीकडे जाऊन मैत्री जपण्याचे महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी सांगितले की, आमची मैत्री अनेक वर्षांची आहे. राजकीय भूमिका भिन्न असल्या तरी वैयक्तिक स्नेह कधीही कमी होणार नाही. निवडणूक संपली आहे, आता निवडणुकीपुरता असलेला राजकीय संघर्ष मागे टाकून निखळ मैत्री जपत पुढे जाऊ.
यावेळी ॲड. दीपक पटवर्धन यांनी संतोष थेराडे यांच्या पुढील कार्यकाळासाठी मनःपूर्वक शुभेच्छा देत त्यांच्या नव्या इनिंगसाठी यशाची कामना केली.

