(रत्नागिरी)
शहरानजिकच्या मिरजोळे एमआयडीसी रेल्वे पूल येथे रेल्वे कर्मचाऱ्याने ट्रेनसमोर झोकून देत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. संदीप तानाजी लोंढे (40, रा. कोकण रेल्वे कॉलनी, रत्नागिरी) असे या कर्मचाऱ्याचे नाव असून त्याचा मृतदेह रेल्वे पोलिसांना आढळून आला.
संदीप हा कोकण रेल्वेमध्ये ट्रकमॅन म्हणून काम करत होता मंगळवारी रात्रीच्या सुमारास तो एमआयडीसी येथील रेल्वे पुलावर गेला होता. रात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास येणाऱ्या एक्सप्रेस गाडीसमोर झोकून देत आपल्या आयुष्याचा शेवट केला. या घटनेची खबर रेल्वे पोलिसांना मिळताच त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. संदीप याचा छिन्न-विछिन्न अवस्थेतील मृतदेह रेल्वे पोलिसांना दिसुन आला. रेल्वे पोलिसांनी पुढील कार्यवाहीसाठी रत्नागिरी ग्रामीण पोलिसांना या प्रकाराची माहिती दिली.
तत्काळ रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करण्यास सुरुवात केली. यावेळी पोलिसांना संदीप याच्याजवळ ओळख पटविणारे काही कागदपत्रे सापडली. त्यावर हा मृतदेह संदीप लोंढे याचा असल्याचे निष्पन्न झाले. संदीपने इतक्या टोकाचे पाऊल का उचलले, आत्महत्या करण्यामागील नेमके कारण काय हे अद्याप अस्पष्ट आहे.