(रत्नागिरी /प्रतिनिधी)
ग्रामपंचायत शिवारआंबेरेच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद घेत असतानाच अचानक छातीत तीव्र वेदना सुरू झाल्याने एका प्रौढाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री घडली. या आकस्मिक घटनेमुळे शिवारआंबेरे परिसरात हळहळ व्यक्त होत असून उत्सवाच्या वातावरणावर शोककळा पसरली आहे.
संदेश अनंत पाटील (वय ४२, रा. सांडमवाडी-शिवारआंबेरे, रत्नागिरी) असे मृत प्रौढाचे नाव आहे. याबाबत सुदेश अनंत पाटील यांनी पूर्णगड पोलिस ठाण्यात माहिती दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि. १४) रात्री ग्रामपंचायत शिवारआंबेरेच्या ५० व्या सुवर्णमहोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेले नाटक पाहण्यासाठी संदेश पाटील गेले होते. गावात उत्सवी वातावरण असताना मध्यरात्री सुमारे १.१५ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या छातीत अचानक दुखू लागले. प्रकृती बिघडल्याचे लक्षात येताच नातेवाईकांनी आणि उपस्थितांनी तत्काळ त्यांना रिक्षाने पावस प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.
मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. या घटनेने कार्यक्रमस्थळी काही काळ हळहळ आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, याप्रकरणी पूर्णगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील कार्यवाही सुरू आहे. संदेश पाटील यांच्या अकाली निधनामुळे शिवारआंबेरे गावात शोककळा पसरली आहे.

