(लांजा)
तालुक्यातील देवधे गोंधळीवाडी येथे ६५ वर्षीय वृद्धाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अतिप्रमाणात मद्यपानाच्या सवयीमुळे नशेच्या अवस्थेत त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
काशीराम ढाक गोंधळी (वय ६५, रा. देवधे गोंधळीवाडी, ता. लांजा) असे मृत वृद्धाचे नाव आहे. काशीराम यांना गेल्या काही काळापासून मोठ्या प्रमाणात मद्यपान करण्याची सवय असल्याचे स्थानिकांकडून सांगितले जाते. मिळालेल्या माहितीनुसार, ११ मार्च २०२६ रोजी सायंकाळी सुमारे साडेसहा वाजण्याच्या सुमारास ते दारूच्या नशेत असताना राहत्या घरातील खोलीत लाकडी वाशाला नायलॉनच्या दोरीने गळफास लावून घेतला. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच लांजा पोलीस ठाण्यात रात्री १०.२१ वाजता या प्रकरणाची नोंद करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेबाबत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे. दरम्यान, एका वृद्धाने अशा प्रकारे जीवन संपवल्याची घटना समोर आल्यानंतर देवधे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

