(लांजा/ प्रतिनिधी)
तालुक्यातील खावडकरवाडी परिसरात भाड्याने वास्तव्यास असलेल्या ३५ वर्षीय विवाहितेचा झोपेत असताना अचानक प्रकृती बिघडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी पहाटे घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
सौ. जान्हवी महेश देवरुखकर (वय ३५) या मूळच्या राजापूर तालुक्यातील वडदहसोळ मिरजोळकरवाडी येथील रहिवासी होत्या. सध्या त्या पतीसह लांजा येथील खावडकरवाडी परिसरात प्रकाश जोशी यांच्या घरात भाड्याने राहत होत्या. शनिवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास त्या घरात झोपलेल्या असताना अचानक थरथरू लागल्याचे त्यांच्या पतीच्या निदर्शनास आले. पत्नीची प्रकृती बिघडल्याचे लक्षात येताच महेश देवरुखकर यांनी तातडीने घरातील दिवा सुरू केला. त्यावेळी जान्हवी यांच्या तोंडातून फेस येत असल्याचे तसेच हातपाय थंड पडल्याचे दिसून आले. या घटनेनंतर त्यांनी तातडीने रुग्णवाहिका बोलावून पत्नीला उपचारासाठी प्रथम खासगी स्वामी समर्थ हॉस्पिटलमध्ये नेले. त्यानंतर अधिक उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय, लांजा येथे दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले.
या घटनेची माहिती मिळताच लांजा पोलिसांनी रुग्णालयात धाव घेत पंचनामा केला. पती महेश यशवंत देवरुखकर यांनी दिलेल्या माहितीनुसार लांजा पोलीस ठाण्यात बी.एन.एस.एस. कलम १९४ अन्वये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

