(मंडणगड)
तालुक्यातील दंडनगरी येथील ४४ वर्षीय तरुणाचा मुंबईतील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. चौथ्यांदा आलेल्या तीव्र हृदयविकाराच्या झटक्यामुळे हा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून, याप्रकरणी मंडणगड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सुनील गोविंद काप (वय ४४, रा. दंडनगरी, ता. मंडणगड) असे मृत तरुणाचे नाव आहे. त्यांना यापूर्वी तीन वेळा हृदयविकाराचा झटका येऊन गेला होता. दरम्यान, ८ मार्च २०२६ रोजी मध्यरात्रीनंतर सुमारे साडेबाराच्या सुमारास त्यांच्या छातीत अचानक तीव्र वेदना जाणवू लागल्या. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांच्या पत्नी आणि चुलत भाऊ पांडुरंग काप यांनी त्यांना तातडीने खासगी वाहनाने उपचारासाठी मुंबईकडे हलवले. पहाटे सुमारे पावणेपाचच्या सुमारास त्यांना मुंबईतील सर जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेची नोंद सुरुवातीला मुंबईतील जे. जे. मार्ग पोलीस ठाण्यात शून्य क्रमांकाने करण्यात आली होती. त्यानंतर संबंधित कागदपत्रे मंडणगड पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आली. त्यानुसार ११ मार्च २०२६ रोजी सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास सुरू आहे. दरम्यान, तरुण वयातच सुनील काप यांचे निधन झाल्याने दंडनगरी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

