(गणपतीपुळे / वैभव पवार)
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या राज्याच्या विविध भागातील सुमारे 30 पर्यटक निवासांचे खाजगीकरण करण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला होता. या खाजगीकरणाला विरोध म्हणून महाराष्ट्रातील कंत्राटी कर्मचारी शुक्रवार दिनांक २७ सप्टेंबर रोजी होणाऱ्या जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने काळ्याफिती लावून आंदोलनाच्या तयारीत होते. मात्र याबाबत पर्यटक विकास कर्मचारी संघाचे सरचिटणीस अशोक खामकर यांनी 25 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ प्रधान कार्यालय मुंबईचे व्यवस्थापकीय संचालक मनोजकुमार सूर्यवंशी यांची भेट घेऊन कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत महत्वपूर्ण चर्चा केली.
या चर्चेत महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोज कुमार सूर्यवंशी यांनी कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्याविषयी स्वतंत्र बैठक घेऊन सकारात्मक भूमिका घेण्यात येईल आणि कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्या सोडवण्याचे आश्वासित केले असल्याची माहिती पर्यटन विकास कर्मचारी संघाचे सरचिटणीस अशोक खामकर यांनी दिली. तसेच पर्यटन विकास कर्मचारी संघाचे अध्यक्ष तथा आमदार सचिन भाऊ अहिर यांच्या सूचनेनुसार 27 सप्टेंबर रोजी पर्यटक दिनाच्या दिवशी काळ्याफिती लावून आंदोलन करण्याचा निर्णय स्थगित करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
याबाबत बोलताना खामकर यांनी अशी माहिती दिली की, महाराष्ट्रातील एकूण 30 पर्यटक निवासांचे खाजगीकरण होणार होते. पर्यटक महामंडळामध्ये दोन प्रकारचे कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत. अकरा महिन्यांच्या कंत्राटावरील राज्यातील 47कर्मचाऱ्यांचा कार्यकाल 20 मे 2024 ते 19 एप्रिल 2025 असा आहे मात्र या कर्मचाऱ्यांना 11 सप्टेंबरला नोटीस दिली असून 30 दिवसांनी म्हणजे 11 ऑक्टोबरला त्यांचे कंत्राट रद्द केले जाणार होते तसेच सातशे कर्मचारी बाहेरील एजन्सी कडून कार्यरत असून त्यांना वाऱ्यावर सोडले जाणार होते. महामंडळामध्ये गेल्या अनेक वर्षांत भरती झालेली नाही महामंडळातील नियमित कर्मचारी नियुक्त होत गेले परंतु त्यांच्या जागेसाठी भरती झाली नाही. त्या बदल्यात कंत्राटी कर्मचारी घेतली गेले. शासनाने इतर महामंडळामध्ये वारंवार भरती प्रक्रिया राबवली मात्र पर्यटन विकास महामंडळाकडे दुर्लक्षच केले. याच खाजगीकरणाला विरोध म्हणून आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन लागू व्हावे आणि इतर सर्व मागण्या मान्य कराव्यात या हेतूने व्यवस्थापकीय संचालक यांच्याशी चर्चा झाली आहे त्याबाबत सकारात्मक निर्णय झाला असून आम्ही 27 सप्टेंबर पर्यटन दिनाच्या दिवशी होणारे आंदोलन स्थगित केले असल्याची माहिती खामकर यांनी दिली.